हरियाणा - राज्यातील हिसार येथील लष्करी भागामध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली पोलिसांनी ३ तरुणांना ताब्यात घेतले आहे. संवेदनशिल माहिती पाकिस्तानला पूरवत असल्याचा संशय त्यांच्यावर आहे. या तिघांकडे लष्करी परिसराचे व्हिडिओ चित्रण आढळून आले आहे. त्यांच्या मोबईलवरुन पाकिस्तानात संपर्क केल्याचे तपासात पुढे आले आहे.
पोलीस आणि लष्कराने मिळून ही कारवाई केली. तिघेही आरोपी उत्तर प्रदेश राज्यातील रहिवासी आहेत. खालिद (२२, शामली, मसाबी) तर महताब (वय, २८) आणि रागीब (वय,३४) मुजफ्फरनगर, शेरपूर येथील रहिवासी आहेत. लष्कराकडून तपास झाल्यानंतर त्यांना पोलिसांकडे सोपवण्यात येणार आहे.
हिसार छावणी परिसरामध्ये 'मिलिटरी इंजिनिअर सर्विस' इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे काम मेहताब या ठेकेदाराला देण्यात आले आहे. तर राजीव खैराद बांधकामावर देखरेखीचे काम पाहतो. या बांधकामासाठी बाहेरुन मजूर मागवण्यात आले आहेत. हे तिघेही संशयित मजूर म्हणून छावणी परिसरामध्ये शिरले असल्याचा संशय आहे.
एक आठवड्यापासून लष्करी अधिकारी तिघांवर पाळत ठेऊन होते. हेरगिरीच्या संशयावरुन त्यांना १ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. यातील एका संशयिताच्या मोबाईलवरुन पाकिस्तानात संपर्क साधण्यात आल्याचे तपासात पुढे आले आहे. तसेच त्यांच्या मोबाईलमध्ये छावणी परिसराचे चित्रण केलेले आहे.
संशयितांपैकी खालिद या तरुणाच्या मोबाईलवरुन पाकिस्तानमध्ये संपर्क साधण्यात आला आहे. याबाबत विचारले असता, पाकिस्तानात नातेवाईक असल्याचे त्याने सांगितले. मात्र, कोण नातेवाईक आहे, असे विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तपासानंतर हा क्रमांक पाकिस्तानातील दुरऱ्याच एका व्यक्तीचा असल्याचे समोर आले आहे.