श्रीनगर - जम्मू काश्मीर पोलिसांनी वेळीच समुपदेश केल्याने खोऱ्यातील तीन तरुण दहशतवादी संघटनेत जाण्यापासून थोडक्यात बचावले. या तिघांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. सुरक्षा दलांनी त्यांना पोलीस ठाण्यात नेऊन समूपदेश केले आणि दहशतवादी संघटनेत जाण्यापासून त्यांचे मन वळविले. दरम्यान तरुणांना दहशतवादी संघटनेत जाण्यास मदत करणाऱ्या दोघा जणांना पोलिसांना अटक केली आहे.
तिघेही तरुण दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथील आहेत. काही तरुण दहशतवादी संघटनेत जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुरक्षा दलांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी चपळाईने कारवाई करत तरुणांना शोधून काढले. हस्तकांमार्फत या तिघांनी दहशतवाद्यांशी संपर्कही साधला होता. त्या दोन हस्तकांना पोलिसांनी अटक केली आहे.
इलियास अमिन वाणी (21), अब्रार अहमद रेशी (17) दोघेही त्राल भागातील मंदोरा गावात राहतात. तर उबेद अहमद शाह (19) शालदरामन या गावात राहणारा आहे. तिघा युवकांना पोलिसांनी समुपदेशनानंतर कुटुंबियांच्या हवाली केले.
दहशतवादी संघटनेत जाण्यासाठी तरुणांना मदत करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. रिझवान अहमद वाणी आणि रईस अहमद चोपन असे मंदोरा गावात राहणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.