हुबळी (कर्नाटक)- देशविरोधी कृत्य केल्याबद्दल हुबळी न्यायालयाने आज अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या तीन विद्यार्थ्यांना २ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. देशविरोधी कृत्य केल्याप्रकरणी या विद्यार्थ्यांच्या विरोधात शहरातील काही वकील आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केले होते.
शहरातील के.एल.ई तंत्रज्ञान विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या या तीन काश्मीरी विद्यार्थ्यांनी पाकिस्तानच्या समर्थनात घोषणाबाजी केली होती. त्यांच्या या कृत्याचे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाले होते. त्यानंतर पोलिसांनी देशविरोधी कार्य आणि सामाजिक सौहार्द बिघडविण्याचा आरोपाखाली या विद्यार्थ्यांना शनिवारी अटक केली होती. त्यानंर, कलम १६९ अंतर्गत बाँड भरून हे तिन्ही विद्यार्थी मुक्त झाले होते. मात्र, सामाजिक कार्यकर्ते, वकील आणि समाजातील काही घटकांनी या कृत्याचा निषेध केल्यानंतर पोलिसांनी या तीन्ही विद्यार्थ्यांना रविवारी (१७ ब्रुवारी) मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा अटक केली. त्यानंतर या विद्यार्थ्यांना हुबळी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या विद्यार्थ्यांना २ मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
हेही वाचा- निर्भया प्रकरण : 'तारीख पे तारीख...मात्र, प्रत्येक सुनावणी वेळी न्यायाची अपेक्षा कायम'