कोची – केरळमध्ये 75 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार आणि जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात पुठेनकुरीशू पोलिसांनी एक महिला, तिचा मुलगा व आणखी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. गंभीर जखमी झालेल्या पीडित महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
आरोपीच्या घरात पीडितेवर बलात्कार करत जीवघेणी मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मनोज आणि त्याची आई ओमाना आणि मोहम्मद शफी या तिघांना अटक केली आहे.
नाव न सांगण्याच्या अटीवर पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, की आरोपीविरोधात जीवघेणा हल्ला आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपींना लवकरच न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. बलात्काराची घटना रविवारी दुपारी घडली आहे. पीडित महिला ही जवळील राहणाऱ्या मैत्रिणीच्या घराकडे जात होती. तेव्हा आरोपींनी तिला तंबाखू खायला देण्याच्या बहाण्याणे घरात बोलावून घेतले होते. त्यानंतर आरोपींनी बलात्कार करून पीडितेला जीवघेणी मारहाण केली होती. या गंभीर गुन्ह्याची दखल घेत केरळ महिला आयोगाने सू मोटो घेत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिला ही झोपेतून जमिनीवर पडल्याने जखमी झाल्याचे ओमाना या आरोपी महिलेने शेजारील लोकांना सांगितले होते. जखमी झालेल्या पीडितेला तिच्या घरी नेण्यात आले. त्यानंतर जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीडितेची अवस्था अधिक गंभीर झाल्यानंतर कोलेचेरी येथील खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तातडीने पीडितेवर शस्त्रक्रिया केली आहे. आरोपीच्या मुलाने वृद्ध महिलेच्या अंतर्गत भागात धारदार वस्तूने अनेक जखमा केल्या आहेत.