तिरुवंनतपूरम - देशभरामध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत आहे. यातच केरळमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला. पाच कोरोनाबाधित डॉक्टर आणि परिचारकांच्या तब्बल 20 हजार जण संपर्कात आल्याची माहिती आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
मलप्पुरम जिल्ह्यातील एडप्पल येथे दोन डॉक्टर आणि तीन परिचारिकांना कोरोनाची लागण झाली आहे. या डॉक्टर आणि परिचारिकांचा संपर्क तब्बल 20 हजार जणांशी आल्याचे समोर आले आहे. दोन डॉक्टरांची कोरोना चाचणी रविवारी पॉझिटिव्ह आली आहे. यामध्ये एक डॉक्टर बालरोगतज्ञ आणि दुसरा डॉक्टर चिकित्सक आहे. या डॉक्टरांचा त्यांच्या रूग्णांशी जवळचा संबंध आला आहे.
परिचारिका आणि डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. सोमवारी आरोग्य अधिकाऱ्यांची तातडीची बैठक झाली. यामध्ये राज्याचे उच्च शिक्षणमंत्री के.टी. जलीलने त्यांना 1 हजार 500 जणांची चाचणी घेण्यास सांगितले असून इतरांची आवश्यकतेनुसार चाचणी केली जाईल.
मलप्पुरम जिल्ह्यात सध्या 224 कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. राज्यातील 14 जिल्ह्यांमधील हे दुसरे मोठे शहर आहे. जिथे कोरोनाबाधित आढळले आहेत. तसेच 24 हजार पेक्षा जास्त लोकांना होम आयोलेशन, कोरोना केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.