नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. योगी आदित्यनाथ सरकारमधील दोन ज्येष्ठ मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशचे ग्रामविकास मंत्री राजेंद्र प्रताप सिंह आणि आयुष राज्यमंत्री धरम सिंह सैनी यांना कोरोनाची बाधा झाली आहे.
राजेंद्र प्रताप सिंह यांच्यासह पत्नी, सून मुलगा आणि नातवंडाना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांना संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एसजीपीजीआयएमएस) मध्ये दाखल केले. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात आहे.
आयुष राज्यमंत्री धरम सिंह सैनी यांना पिलाखनी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या 27 जणांचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
दरम्यान, विरोधी पक्षनेते व समाजवादीचे ज्येष्ठ आमदार राम गोविंद चौधरी देखील कोरोना चाचणी घेतल्यानंतर रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना ह्रदयाचा देखील त्रास असून त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत 26 हजार 554 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 773 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 18 हजार 154 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. तर 7 हजार 627 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.