श्रीनगर - दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील सुग्गू हेंधामा परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात सुरक्षा दलाच्या जवानांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.
'ईटीव्ही भारत'ला मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराची ४४RR, CRPF आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने शोध मोहीम सुरू केली. या शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलाने संशयास्पद जागेला घेराव घातला आणि या भागात शोध मोहीम सुरू केली. तेव्हा त्या परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. याला सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत जवानांनी ५ दहशतवाद्यांना ठार केले.
दरम्यान, मागील काही दिवसात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यातील ही तिसरी चकमक आहे. आतापर्यंत मागील दोन कारवाईत भारतीय जवानांनी ९ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार यातील तिघे जण दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनचे कमांडर होते.
याआधी जम्मू-काश्मीरमधील तीन तरुणांना समुपदेशन करून दहशतवाद्यांच्या गटात सामील करण्याचा डाव सुरक्षा दलाने हाणून पाडला होता. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल आणि किशोर येथील मुलांवर समुपदेशन करण्यात येत होते. त्यांच्यावर समुपदेशन करणाऱ्या दोघांना जवानांनी अटक केली. रिझवान अहमद वानी आणि रईस अहमद चोपान असे अटक करण्यात आलेल्यांची नावे असून ते मंदुरा गावचे रहिवाशी आहेत. त्राल परिसरातील पन्नर, मंदूर, चंकितरार, रत्सुना येथून लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेच्या दहशतवाद्यांना रसद, निवारा देणे आणि अन्य मदत पुरवली जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - कोरोनाबाबतच्या समस्यांसाठी एअर इंडिया सुरू करणार 'कोविड-सेल'
हेही वाचा - अमेरिकेतील ओसीआय कार्डधारकांसोबत मुंबई विमानतळावर गैरवर्तन, सात तास ठेवले बसवून