नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत सातव्या टप्प्यात एकूण ९०९ उमेदवारांपैकी १७० (१९ टक्के) उमेदवारांनी आपल्या विरोधात गुन्हे दाखल असल्याचे घोषित केले आहे. तर १२७ (१४ टक्के) उमेदवारांनी आपल्या विरोधात गंभीर गुन्हे असल्याचे घोषित केले आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या रिपोर्टनुसार प्रमुख पक्षात भारतीय जनता पक्षाचे ४३ पैकी १८ उमेदवार (४२ टक्के), काँग्रेसच्या ४५ पैकी १४ (३१ टक्के), बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) ३९ पैकी सहा (१५ टक्के). आम आदमी पक्षाच्या (आप) १४ पैकी तीन (२१ टक्के) उमेदवारांविरोधात गुन्हे असल्याचे घोषित केले आहे.
'नॅशनल इलेक्शन वॉच' आणि 'एडीआर' या संस्थाकडून सातव्या टप्प्यातील ९१८ पैकी ९०९ उमेदवारांच्या अर्जांचे विश्लेषण केले आहे. यातील १५९ उमेदवार राष्ट्रीय पक्षातील, ६८ राज्यस्तरीय पक्षातून, ३६९ मान्यता नसलेल्या नोंदणीकृत पक्षाकडून आणि ३१३ उमेदवार हे अपक्ष आहेत. भाजपच्या ४३ पैकी १५, काँग्रेसच्या ४५ पैकी १० , बसपच्या ३९ पैकी चार, एआईएडीएमकेच्या २२ पैकी एक, डीएमकेच्या २४ पैकी सात आणि आपच्या १४ पैकी एक तसेच ३१३ अपक्ष उमेदवारांच्यापैकी २४ उमेदवारांनी आपल्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल असल्याचे घोषित केले आहे.
सातव्या टप्प्यातील ५९ जागांपैकी ३३ जागा या रेड अलर्ट जागा आहेत. रेड अलर्ट जागा म्हणजे ज्या मतदारसंघात तीन किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल आहेत. पाच उमेदवारांनी आपल्या विरोधात दोषी ठरवण्यात आलेले प्रकरण घोषित केले आहे. १२ उमेदवारांनी खून संबंधित प्रकरण असल्याचे घोषित केले आहे. ३४ प्रकरण खूनाचा प्रयत्न, सात अपहरण प्रकरणाशी संबंधित आहेत.