नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील 24 तासात कोरोनाचे 186 नवीन रुग्ण समोर आले आहेत. दिल्लीतील एकूण रुग्णांचा आकडा 1 हजार 893 वर पोहोचला आहे.
मागील काही दिवसात दिल्लीच्या अनेक भागांतून मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण समोर येत आहेत. आत्तापर्यंत दिल्ली सरकारने 76 ठिकाणांना 'कन्टेंमेन्ट' म्हणून घोषित केले आहे.
दिल्लीत सध्या कोरोनाच्या 1 हजार 643 अॅक्टीव केसेस आहेत. यातील 959 रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात असून 26 अतिदक्षता विभागात आहेत. 6 रुग्ण व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आत्तापर्यंत दिल्लीत 22 हजार 283 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यापैकी 1 हजार 893 पॉझिटिव्ह असून 2 हजार 799 चाचण्यांचे अहवाल येणे बाकी आहे.
गेल्या 24 तासात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला तर 134 बरे झाले. दिल्लीत आत्तापर्यंत 43 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून 207 रुग्ण ठीक झाले आहेत. दरम्यान, सरकारच्या हेल्थ बुलेटीनमध्ये मरकजसंदर्भात माहिती दिली जात असे. मात्र, काल आलेल्या माहितीमध्ये मरकजचा स्तंभ वगळण्यात आला आहे. यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे मागील 24 तासात समोर आलेल्या कोरोनाबाधितांमध्ये मरकजशी निगडीत किती आहेत, हे समजण्यास मार्ग नाही.