नवी दिल्ली - भारतातील कोरोना संसर्गाचे रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशात एकूण 1 हजार 553 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 36 जण दगावले आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत.
देशातली एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 17 हजार 265 झाला आहे, यात 14 हजार 175 अॅक्टिव्ह केसेस आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर 2 हजार 546 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तसेच 543 जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
महाराष्ट्रामध्ये 4 हजार 203 कोरोनाबाधित असून 223 जणांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये 1 हजार 477 कोरोनाबाधित असून 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच दिल्लीमध्ये 2 हजार 3 कोरोनाबाधित तर 45 जणांचा मृत्यू झाला आहे. यापाठोपाठ राजस्थानमध्येही 1हजार 478 कोरोनाबाधित आढळले असून 14 जणांचा मृत्यू झाला आहे.