भोपाळ - मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यात अंगाचा थरकाप उडवणारी लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. एका तेरा वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिला जिवंत गाडण्यात आले. या बालिकेची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका नाल्याजवळ मुलीला दगडांखाली गाडण्यात आले होते. या घटनेने राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. महिला अत्याचाराविरोधात सरकार कठोर पावले उचलत असल्याचे सांगत असतानाच ही संताप आणणारी घटना घडली आहे.
शेतात गेली असता अत्याचार -

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जिल्ह्यातील घोडाडोंगरी येथे एक अल्पवयीन मुलगी शेतात मोटार बंद करण्यासाठी गेली असता तेथे एका व्यक्तीने मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर एका नाल्याजवळ तिला जिवंत गाडले. बराच वेळ मुलगी घरी आली नाही, म्हणून कुटुंबीयांनी शोध सुरू केला. तेव्हा नाल्याजवळ दगडांच्या आणि काट्यांच्या ढिगाखाली मुलगी गंभीर अवस्थेत दिसली. त्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ मुलीला रुग्णालयात दाखल केले.
आरोपीच्या मुसक्या आवळल्या -
घटनेची माहिती मिळताच घोडाडोंगरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन पीडित बालिकेचा जबाब नोंदवला. सध्या मुलीची प्रकृती गंभीर असून जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस ठाणे प्रमुख रवी शाक्य यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.