इंफाळ - लोकसभा निवडणुकीनंतर ईशान्येकडील राज्यांत काँग्रेस पक्षाला भगदाड पडत आहे. मणिपूरमध्ये काँग्रेसच्या १२ आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
ईशान्येकडील मणिपूर आणि नागालँड या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील जागांवर काँग्रेसचा पराभव झाला. या दोन्ही जागांवर भाजपचे उमदेवार विजयी झाले आहेत. या पराभवानंतर काँग्रेसच्या १२ आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा मणिपूर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गैखंगम यांच्याकडे सोपवला.
राजीनामा देणारे आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मात्र, या आमदारांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत पक्षबांधणीसाठी राजीनामे दिल्याचे एका काँग्रेस आमदाराने सांगितले. मात्र, ईशान्येकडील या राज्यांत भाजपचा वाढता प्रभाव पाहता विरोधी पक्षातील अनेक नेत्यांचा भाजपकडे ओघ वाढला आहे. त्यामुळे हे आमदारही भाजपमध्येच प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मणिपूरमध्ये भाजपचे बीरेन सिंह यांच्या नेतृत्वात स्थानिक पक्षांच्या पाठिंब्याने सरकार सत्तेत आहे. २०१७ च्या विधानसभआ निवडणुकीत काँग्रेसला २९ जागा मिळवता आल्या होत्या. मात्र, त्यानंतर लगेच ८ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता १२ आमदारांनी राजीनामे दिल्याने काँग्रेसची दुबळी अवस्था झाली आहे.