हैदराबाद - सध्या कोरोनाने देशभरात थैमान घातले आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यासाठी देशभरात लॉकडाऊन सध्या सुरू आहे. या काळात गरिबांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळेच हैदराबादमधील एका ११ वर्षीय चिमुकलीने ९ लाख ४० हजार रुपये या गरिबांसाठी मदत करण्यासाठी जमा केले आहेत.
रिद्धी असे या चिमुकलीचे नाव असून ती सध्या सहावीत शिकत आहे. कोरोनामुळे देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊचा पहिला टप्पा संपला असून आता ३ मेपर्यंत लॉकडाऊन पार्ट २ सध्या सुरू आहे. अशावेळी अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बंद आहे. त्यामुळे रोजंदारीवर पोट असलेल्या गरीबांचे या काळात खाण्याचे प्रचंड हाल होत आहेत. याच भावनेतून चिमुकल्या रिद्धीने लोकांना आवाहन करण्यसह इतर विविध मार्गाने पैसे जमा केले आहेत. जवळपास ९ लाख ४० हजार रुपये रिद्धीने गरिबांच्या मदतीसाठी जमा केले आहेत.
या दरम्यान, लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर रिद्धी रोज बातम्यांमध्ये कोरोना व्हायरसबद्दल पाहत होती. तेव्हापासूनच तिने गरिबांच्या मदतीसाठी पुढाकार घेत पैसे जमा करण्यास सुरुवात केल्याचे रिद्धीची आई शिल्पा यांनी सांगितले आहे. रिद्धीने सुरुवातील स्वत:चे पॉकेट मनी दिले आहेत. त्यातून सुरुवातीला तिने जीवनावश्यक वस्तूंचे २०० किट गरीबांना वाटप केले आहेत. या किटमध्ये ५ किलो तांदूळ, १ किलो दाळ, १ किलो मीठ, चटणी पॅकेट, हळद, तेल तसेच दोन साबणांचे मिळून १ किट तयार केल्याचे शिल्पा यांनी सांगितले आहे.