अमरावती(आंध्र प्रदेश) - विशाखापट्टनम येथील हिदुस्तान शिपयार्डमध्ये आज सकाळी अपघात झाला. या अपघातात ११ कामगारांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी आहेत. शिपयार्डमधील अवाढव्य क्रेन अचानक कोसळल्याने हा अपघात झाला.
बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अद्यापही काही लोक क्रेनखाली अडकले असण्याची शक्यता आहे. जखमींना जवळच्या उपचारांसाठी जवळच्या खासगी रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.
आज सकाळी साडे अकराच्या दरम्यान शिपयार्डमध्ये क्रेनची चाचणी घेतली जात होती. त्यावेळी काही अधिकाऱ्यांसह २० कामगार तेथे हजर होते. चाचणीदरम्यान अचानक क्रेन कोसळले. यात ११ जणांचा मृत्यू झाला. यापैकी ४ जण कायमस्वरूपीचे कामगार आहेत तर ७ कामगार कंत्राटी होते. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी व्ही. विनय चंद यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
अपघात झालेल्या क्रेनचे वजन ७० टन होते. दोन वर्षांपासून या क्रेनची निर्मीती सुरू होती. आज सकाळी त्याची चाचणी घेण्यात येत होती. क्रेनच्या वजन उचलण्याची क्षमता तपासली जात असताना वरील भागात असलेल्या केबिनचा काही भाग क्रेनपासून अलग झाला आणि त्यानंतर काही वेळेतच संपूर्ण क्रेन खाली आले, अशी माहिती जिल्हाधिकारी व्ही. विनय चंद यांनी दिली.
दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांनी या अपघाताची माहिती घेतली. त्यानंतर जिल्हा प्रशासन आणि विशाखापट्टनम पोलिसांना या प्रकरणी तत्काळ योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.