बनिहाल (जम्मू-काश्मीर) : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले की, जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात त्यांच्या भारत जोडो यात्रे दरम्यान पोलिस बंदोबस्त कोलमडला होता. त्यानंतर त्यांनी त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सल्ल्यानुसार आजची यात्रा रद्द केली. राहुल गांधी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, 'यात्रेचे लोकांकडून जोरदार स्वागत झाले. सकाळपासून लोक जमले होते आणि आम्ही प्रवासासाठी उत्सुक होतो. मात्र आम्हाला यात्रेदरम्यान सुरक्षेच्या गराड्याजवळ राहणारे पोलीस दिसले नाही.
सुरक्षेतील त्रुटीमुळे यात्रा थांबवली : यात्रेदरम्यान मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते तिरंगा हातात घेऊन राहुल यांच्यासोबत मोर्चा काढताना दिसले. दरम्यान, जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या काँग्रेस प्रभारी रजनी पाटील यांनी ट्विट केले की, 'राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेला सुरक्षा प्रदान करण्यात जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश प्रशासन अपयशी ठरले आहे. सुरक्षेतील त्रुटी जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश प्रशासनाची अयोग्य आणि अपरिपक्व वृत्ती दर्शवते.
'भविष्यात देखील अशी पदयात्रा करणार' : राहुल गांधी म्हणाले, माझ्या सुरक्षेशी संबंधित लोक यामुळे अस्वस्थ झाले आणि त्यांनी सांगितले की मी पुढे प्रवास करू नये. त्यामुळे मला आजचा प्रवास रद्द करावा लागला. ते म्हणाले, पोलिसांच्या भूमिकेची हमी देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. माझ्या सुरक्षेत गुंतलेल्या लोकांच्या सूचनांविरुद्ध जाणे माझ्यासाठी खूप कठीण आहे. काँग्रेस नेते म्हणाले, असे का झाले हे मला माहीत नाही, पण उद्या आणि परवा असे घडू नये. एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी भविष्यात देखील अशी पदयात्रा करणार असल्याचे सांगितले. 'भारत जोडो यात्रा' 7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरू झाली. ३० जानेवारीला श्रीनगरमध्ये तिचा समारोप होणार आहे.
ओमर अब्दुल्ला यात्रेत सहभागी : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे (NC) उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनीही बनिहालमध्ये भारत जोडो यात्रेत भाग घेतला. राहुलसारखा पांढरा टी-शर्ट परिधान करून उमर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे हजारो समर्थक राहुलसोबत पदयात्रेत सहभागी झाले होते. श्रीनगरपासून 120 किमी अंतरावर असलेल्या बनिहालमध्ये पोहोचल्यानंतर पत्रकारांशी बोलताना उमर म्हणाले, 'भारत जोडो यात्रेचा उद्देश राहुल गांधींची प्रतिमा सुधारणे नसून देशाच्या सद्यस्थितीत बदल घडवून आणणे हा आहे.' त्यांना देशाच्या प्रतिमेची काळजी असल्याने ते या यात्रेत सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले. ओमर म्हणाले, 'आम्ही कोणा एका व्यक्तीच्या प्रतिमेसाठी नाही तर देशाच्या प्रतिमेसाठी यात सहभागी होत आहोत. राहुल गांधी यांनी वैयक्तिक कारणांसाठी यात्रा काढली नाही, परंतु देशात जातीय तणाव निर्माण करण्याच्या आणि अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्याच्या कथित प्रयत्नांबद्दल त्यांच्या चिंता लक्षात घेऊन त्यांनी हे पाऊल उचलले आहे.'
'संसदेत मुस्लिमांना प्रतिनिधित्व नाही' : ओमर अब्लुल्ला पुढे म्हणाले, 'हे सरकार अरब देशांशी मैत्री करत असले तरी सत्य हे आहे की या सरकारमध्ये देशातील सर्वात मोठ्या अल्पसंख्याक समाजाचा एकही प्रतिनिधी नाही.' ओमर म्हणाले, 'स्वातंत्र्यानंतर बहुधा ही पहिलीच वेळ आहे जेव्हा सत्ताधारी पक्षातील मुस्लिम समुदायाचा एकही सदस्य लोकसभेत किंवा राज्यसभेत नाही. यावरून त्यांची मुस्लिमांप्रतीची भूमिका दिसून येते.
'निवडणुकीसाठी भीक मागावी अशी सरकारची इच्छा' : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याबाबत काँग्रेसच्या भूमिकेबाबत विचारले असता उमर म्हणाले की, आम्ही कलम ३७० पुनर्स्थापित करण्यासाठी न्यायालयात खटला लढवू. संबंधित याचिकेच्या सुनावणीपासून सरकार ज्या प्रकारे पळ काढत आहे, त्यावरून आमची केस खूप मजबूत असल्याचे दिसून येते. जम्मू-काश्मीरमधील निवडणुकांबाबत ते म्हणाले की, आठ वर्षे झाली आहेत. मागील विधानसभा निवडणूक 2014 मध्ये झाली होती. जम्मू-काश्मीरमधील दोन निवडणुकांमधील हे सर्वात मोठे अंतर आहे. खोऱ्यात दहशतवादाच्या शिखरावर असतानाही हे घडले नाही. जम्मू-काश्मीरच्या जनतेने निवडणुकीसाठी भीक मागावी अशी सरकारची इच्छा आहे, असा आरोप त्यांनी केला. मात्र आम्ही भिकारी नाही आणि आम्ही यासाठी भीक मागणार नाही', असे ते शेवटी म्हणाले.
३० जानेवारीला यात्रेचा समारोप : गुरुवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त एक दिवसाच्या विश्रांतीनंतर भारत जोडो यात्रा शुक्रवारी सकाळी बनिहाल येथून पुन्हा सुरू झाली. बुधवारी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळल्याने यात्रा रामबन येथे थांबवावी लागली. यात्रा काझीगुंड मार्गे बनिहाल मार्गे काश्मीर खोऱ्यात प्रवेश करेल आणि अनंतनाग जिल्ह्यातील खानाबल येथे पोहोचेल. तिथे ती रात्री मुक्काम करेल. 7 सप्टेंबर 2022 रोजी तामिळनाडूमधील कन्याकुमारी येथून सुरू झालेली भारत जोडो यात्रा पंजाबमार्गे जम्मू-काश्मीरमध्ये दाखल झाली. ३० जानेवारी रोजी राहुल श्रीनगरमधील काँग्रेस मुख्यालयात तिरंगा फडकवतील आणि शेर-ए-काश्मीर क्रिकेट स्टेडियमवर जाहीर सभेला संबोधित करतील. त्यानंतर या यात्रेचा समारोप होईल.
हेही वाचा : Rahul Gandhi Security : भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधीच्या सुरक्षेत चूक, संतप्त कॉंग्रेसची प्रशासनावर टीका