बंगळुरु : लग्नाच्या तीन वर्षानंतर पती समलैंगिक असल्याचे बिंग फुटल्याने महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. ही घटना बंगळुरु येथील ज्ञानभारती पोलीस ठाण्याच्या परिसरात उघडकीस आली. पती शारीरिक संबंध करण्यास इच्छूक नसल्याचे वारंवार दिसून येत असल्याने या महिलेला संशय आला होता. त्यामुळे या महिलेने पतीच्या फोनची तपासणी केली. यावेळी पती समलैंगिक असल्याचे बिंग फुटले. महिलेने ज्ञानभारती पोलीस ठाण्यात धाव घेत पतीने फसवल्याची तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी या समलैंगिक पतीवर गुन्हा दाखल केल्याची माहिती ज्ञानभारती पोलिसांनी बुधवारी दिली आहे.
पती शारीरिक संबंधास द्यायचा नकार : या महिलेचा बंगळुरु येथील एका मल्टीनॅशनल कंपनीत कार्यरत असलेल्या तरुणासोबत विवाह झाला होता. मात्र लग्नाच्या तीन वर्षानंतरही तो पत्नीसोबत शारीरिक संबंध करण्यास नकार देत होता. आपण परंपरा म्हणून तुझ्याशी लग्न केल्याचे तो पत्नीला सांगत होता. या महिलेच्या नातेवाईकांनी लग्नात हुंड्यासह अनेक भेटवस्तू दिल्या आहेत. मात्र तरीही पती शारीरिक संबंध करण्यास नकार देत असल्याने महिलेला संशय आला होता.
पतीच्या भावाला झाले मूल झाल्याने वाढला वाद : पीडित महिलेच्या पतीच्या भावाचे लग्न झाल्यानंतर त्यांना मूल झाले होते. मात्र गेली अनेक वर्ष होऊनही मूल न झाल्याने या महिलेने पतीकडे मूल हवे असल्याचा तगादा लावला. आपल्यालाही मूल हवे असल्याचे तिने तिच्या पतीला वारंवार सांगितले. मात्र तिचा पती शारीरिक संबंध करण्यास इच्छूक नसल्याचा आरोप महिलेने केला आहे.
मोबाईलमध्ये आढळलेल्या फोटोने फुटले बींग : लग्नाच्या अनेक वर्षानंतर मूल झाले नसल्याने पत्नी तिच्या पतीकडे मुलासाठी तगादा लावत होती. मात्र तिचा पती तिला प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे महिलेला संशय आला. यावेळी तिने पतीच्या मोबाईल फोनची तपासणी केली. मात्र पतीच्या मोबाईल फोनची तपासणी केल्यानंतर महिलेच्या पायाखालची वाळूच सरकली. पतीचे त्याच्या मित्रासोबत आक्षेपार्ह स्थितीतील फोटो तिला आढळून आले. त्यासह अनेक मेसेजही तिला आढळून आल्याचे पीडितेने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
पतीने दिली आत्महत्या करण्याची धमकी : समलैंगिक पतीचे बिंग फुटल्यानंतर महिलेने त्याच्याकडे जाब विचारला. यावेळी तिच्या पतीने तिला 'मी तुझ्या नावाची चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन' अशी धमकी दिल्याचेही पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. याबाबत मी पतीच्या आई वडिलांना माहिती दिली असता, त्यांनी कुटुंबीयांच्या भलाईसाठी त्याला समजून घेण्याचा सल्ला दिल्याचा आरोपही पीडितेने केला. पतीच्या आई वडिलांना त्याच्याविषयीची माहिती अगोदरच होती, असा दावा महिलेने केला आहे. लग्नात 160 ग्रॅमचे सोने आणि हुंडा घेतल्यानंतरच लग्न केल्याचा आरोपही पीडितेने यावेळी केला आहे.
हेही वाचा -