कोलकाता - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) देण्यात आली आहे. सीआयडी अधिकाऱ्यांचे एक पथक पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील घटनास्थळाला भेट देतील आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवणार आहेत. तृणमूल काँग्रेसचे नेते शिख सुफियान यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे नंदीग्राम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अज्ञात व्यक्तींविरूद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम 341 आणि 323 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदीग्रामध्ये 10 मार्चला प्रचारादरम्यान धक्का लागल्याने ममता बॅनर्जी खाली पडल्या होत्या. या दुर्घटनेत त्यांच्या पायाला आणि कमरेला दुखापत झाली होती. ही घटना हल्ला नसून, केवळ अपघात असल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला. तसेच निवडणूक आयोगाने ममता यांचे सुरक्षा संचालक विवेक सहाय आणि मेदिनीपूरचे माजी पोलीस अधीक्षक प्रवीण प्रकाश यांना निलंबित केले होते. या घटनेनंतर बॅनर्जी यांनी व्हीलचेयरवर बसून प्रचाराला सुरुवात केली. यावरून भाजपासह विरोधी पक्षांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. सहानुभूतीच्या आधारावर मते मिळविण्याची ही चाल असल्याचा आरोप त्यांनी केला.
टीएमसी-भाजपामध्ये अटीतटीचा सामना -
पश्चिम बंगालमधील एकूण 294 विधानसभा जागांसाठी आठ टप्प्यात निवडणुका घेण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान 27 मार्चला होईल. तर 2 मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपाने सुवेंदू अधिकारी यांना उमेदवारी दिली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सुवेंदू अधिकारी टीएमसी सोडून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. नंदीग्राम हा सुवेंदू यांचा गड मानला जातो.
हेही वाचा - बंगालमध्ये एनआरसी लागू होऊ देणार नाही - ममता बॅनर्जी