मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील पोलीस हे त्यांच्या असभ्य वर्तनामुळे बदनाम आहेत. मात्र आता मुझफ्फरनगर मधून पोलिसांच्या वागणुकीची एक अशी घटना समोर आली आहे ज्यामुळे सर्वांनाचा सुखद धक्का बसला आहे. येथील पोलिसांनी एका भिकाऱ्याची मदत केल्याने त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हास्य फुलले आहे.
भिकाऱ्याचे 10 हजार रुपये ओले झाले : उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस पडत आहे. रविवारीही हलका पाऊस झाला. पाऊस थांबताच एक भिकारी रस्त्याच्या कडेला डोकं धरून रडायला लागला. त्याला रडताना पाहून शेजारी उभे असलेले वाहतूक पोलीस त्याच्याजवळ पोहोचले. पोलिसांनी त्याला रडण्याचे कारण विचारले असता भिकाऱ्याने आपली ओली बॅग पुढे केली. पोलिसांनी बॅग उघडली असता त्यात ठेवलेले पैसे भिजलेले दिसले. यानंतर पोलिसांनी त्या सर्व नोटा जमिनीवर पसरवून सुकवल्या व ती बॅग भिकाऱ्याच्या ताब्यात दिली. भिकाऱ्याकडे एकूण 10 हजार रुपये होते.
भिकारी मूकबधीर आहे : हे प्रकरण मुझफ्फरनगरच्या मीनाक्षी चौकातील आहे. ट्रॅफिक कॉन्स्टेबल प्रदीप कुमार यांनी सांगितले की, जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. रविवारी दुपारी पाऊस थांबल्यानंतर त्यांना एक भिकारी डोके धरून रडताना दिसला. त्यांनी भिकाऱ्याला रडण्याचे कारण विचारले असता तो काहीच सांगू शकला नाही. भिकारी मानसिकदृष्ट्या कमकुवत असून मूकबधिरही आहे. खूप विचारणा केल्यानंतर त्याने त्याचा ओला बंडल दाखवला.
पोलिसांनी पैसे सुकवले : पोलिसांनी बंडल उघडले असता त्यांना त्यात 10, 20 आणि 50 च्या नोटा आढळून आल्या. त्या सगळ्या नोटा भिजलेल्या होत्या. भिकाऱ्याने ते सर्व पैसे भीक मागून गोळा केले होते. त्याच्याकडच्या नोटाही खूप जुन्या होत्या, तर अनेक नोटा जळाल्याही होत्या. पैसे ओले झाल्याने आपले सर्व काही गेले असे भिकाऱ्याला वाटले होते, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले. यामुळे तो खूप रडत होता. बरंच समजावून सांगितल्यानंतर तो शांत झाला. पोलिसांनी पैसे कोरडे केल्यानंतर ते भिकाऱ्याला परत केले. यानंतर पोलिसांनी भिकाऱ्याला चहाही दिला.
हेही वाचा :