नवी दिल्ली : सीमा हैदरनं पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात दाखल होत आपल्या प्रियकरासोबत राहणं पसंत केलं आहे. सीमा हैदरपाठोपाठ आता बांग्लादेशची महिला आपल्या मुलासह पतीच्या शोधात भारतात दाखल झाली आहे. बांग्लादेशातून आपला पती त्याच्या भारतातील घरी आल्यानंतर तो परत बांग्लादेशात आला नसल्याची तक्रार या महिलेनं नोएडाच्या महिला पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. सौरभकांत तिवारी असं तिच्या पतीचं नाव असल्याचा दावा या महिलेनं केला आहे.
बांग्लादेशात राहताना महिलेसोबत निकाह : भारताच्या सौरभकांत तिवारीनं बांग्लादेशात राहताना या महिलेसोबत निकाह केल्याचा दावा या महिलेनं केला आहे. सौरभकांत तिवारीच्या शोधात पीडित महिला आपल्या चिमुकल्या मुलाला घेऊन भारतात दाखल झाली आहे. या महिलेनं नवी दिल्लीतील नोएडा येथील महिला पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार दाखल केली आहे. 14 एप्रिल 2021 ला सौरभकांत तिवारीनं या महिलेसोबत निकाह केल्याचा दावा केला आहे. या महिलेनं सौरभकांतपासून आपल्याला एक मुलगा झाल्याचंही आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे.
'दादला' सौरभकांतचं अगोदरही झालं एक लग्न : बांग्लादेशी महिलेनं सौरभकांत तिवारी या भारतीय तरुणानं आपल्याशी बांग्लादेशातील ढाका इथं 14 एप्रिल 2021 मध्ये लग्न केलं आहे. सौरभकांत तिवारीपासून आपल्याला एक मुलगा झाल्याचा दावा या महिलेनं केला आहे. मात्र बांग्लादेशात राहणारा पती भारतात त्याच्या घरी आल्यानंतर तो परत आलाच नसल्याचं या महिलेनं तक्रारीत नमूद केलं. सौरभकांत तिवारी याचं अगोदरही एक लग्न केलं होतं, असा दावाही पीडितेनं केला. मात्र विवाहित असूनही सौरभकांतनं ही गोष्ट आपल्यापासून लपवल्याचं या महिलेनं आपल्या तक्रारीत स्पष्ट केलं आहे.
महिलेनं सादर केला मुलाचा आणि तिचा पासपोर्ट : सौरभकांत तिवारी हा भारतीय तरुण बांग्लादेशातील कल्टी मॅक्स एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत जानेवारी 2017 ते डिसेंबर 2021 या कालावधीत कार्यरत होता. त्यावेळी सौरभकांतनं तिच्यासोबत निकाह केल्याचा दावा महिलेनं केला. नोएडात दाखल झालेल्या महिलेनं तिचा आणि मुलाचा पासपोर्ट, व्हिसा आणि सिटीझन कार्ड पोलिसांना दिलं आहे.
महिलेला नाही पतीविषयीची माहिती : बांग्लादेशच्या महिलेनं नोएडात दाखल होत महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी गौतमबुद्ध नगर पोलीस आयुक्तालयाच्या मीडिया सेलनं माहिती दिली आहे. मात्र या बांग्लादेशी महिलेला सौरभकांत तिवारी याच्याबाबत माहिती नाही. तो कोणत्या गावात राहतो, ही माहिती महिलेकडं उपलब्ध नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. या घटनेचा तपास महिला सुरक्षा विभागाच्या सहायक पोलीस आयुक्तांकडं देण्यात आला आहे. तपासात पुढील माहिती उपलब्ध होईल. सौरभकांत तिवारीवर योग्य ती कारवाई केली जाईल. मात्र हे प्रकरण बांग्लादेशातील आहे, घटनास्थळही बांग्लादेश असल्याची माहिती यावेळी गौतमबुद्ध नगर पोलीस आयुक्त मीडिया सेलकडून देण्यात आली.
हेही वाचा -