बलिया: डायल 112 मध्ये तैनात असलेल्या एका कॉन्स्टेबलने लग्नानंतर घरी आनंदाची बातमी देण्यासाठी सुट्टीचा अर्ज दिला आहे (Leave application for good news). हा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिस विभागात मात्र यावरुन चांगलीच खुमासदार चर्चा सुरू आहे. पोलिस खात्यात जास्त सुट्या नसल्यामुळे या अर्जामुळे चर्चेला चांगलीच फोडणी मिळत आहे. सध्या ज्या कॉन्स्टेबलने रजेसाठी अर्ज केला आहे त्याला रजा देण्यात आली आहे. परंतु त्याने केलेला अर्ज मात्र चर्चेत आहे. अर्ज व्हायरल झाल्यानंतर डायल 112 च्या प्रभारींची चांगलीच हजेरी घेण्यात आली.
28 जुलै रोजी डायल 112 मध्ये तैनात कॉन्स्टेबल सुनील कुमार यादव यांनी अधिकाऱ्यांना रजेचा अर्ज दिला होता. या अर्जात हवालदाराने लिहिले आहे की, 'अर्जदाराच्या लग्नाला 7 महिने झाले, अद्याप कोणतीही चांगली बातमी मिळालेली नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घ्यावे लागेल. तसेच त्यासाठी पत्नीसोबत राहावे लागते. म्हणून घरी जावे लागेल. कृपया १५ दिवसांची रजा द्यावी अशी विनंती आहे.' या अर्जानंतर कॉन्स्टेबलला रजाही देण्यात आली. मात्र त्यांच्या घरी गेल्यानंतर हा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल झाला. या निष्काळजीपणामुळे 112 च्या प्रभारींवर कारवाई करण्यात आली. तसेच त्यांचे काम बदलण्यात आले.
विशेष म्हणजे पोलिस खात्यात सुट्ट्यांचा नेहमीच प्रश्न असतो निवडणुका, सण, कायदा व सुव्यवस्था पाहता पोलिसांना क्वचितच सुट्या मिळतात. अनेकदा दुसऱ्या गावात पोलीस कर्मचारी कुटुंबापासून दूर राहतात. या प्रकरणी अतिरिक्त पोलिस अधीक्षक दुर्गा प्रसाद तिवारी म्हणतात की, सुट्टी घेणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. अधूनमधून सणासुदीची आणीबाणी वगळता सामान्य दिवशी सुट्टी देण्यास हरकत नाही. कॉन्स्टेबलच्या या अर्जाबाबत कोणतीही माहिती नाही.