नवी दिल्ली - योगगुरु रामदेव बाबा यांनी अलोपॅथी उपचारपद्धतीवर टीका केल्यानंतर चांगलाच वाद उफाळून आला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) उत्तराखंडने रामदेव बाबा यांना कायदेशीर नोटीस बजावली. रामदेव बाबांनी येत्या 15 दिवसांच्या आत माफी मागितली नाही तर त्यांच्यावर एक हजार कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला जाईल, असे आयएमएने नोटीसमध्ये म्हटलं आहे.
इतकेच नव्हे तर आयएमएने रामदेव यांना 72 तासात कोरोनिल किटची दिशाभूल करणार्या जाहिराती काढण्यास सांगितले आहे. संबंधित जाहिरातींमध्ये कोरोना लसीनंतर होणाऱ्या दुष्परिणामांवर कोरोनिल प्रभावी आहे, असा दावा रामदेव यांनी केला आहे.
रामदेव बाबांनी ट्विट करत आयएमएला 25 प्रश्न विचारले होते. त्यावरही आएमएकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. बाबा रामदेव यांना अॅलोपॅथीचा 'अ' देखील माहित नाही. आम्ही त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहोत. परंतु प्रथम त्यांनी आपली पात्रता सांगावी. येत्या 15 दिवसाच्या आत रामदेव बाबांनी माफी मागवी. नाहीतर त्यांच्यावर एक हजार कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला जाईल, असे असे आयएमएने म्हटलं.
तर रामदेव बाबांना नोबेल पारितोषिक द्याव -
बाबा रामदेव यांना समोरासमोर बसून उत्तरे देण्यास तयार आहे. अॅलोपॅथी बद्दल बाबा रामदेव यांना फारशी माहितीही नाही. असे असूनही, ते अॅलोपॅथी आणि डॉक्टरांविरोधात बेकायदा वक्तव्य करीत आहेत. यामुळे रात्रंदिवस रुग्णांच्या सेवेत गुंतलेल्या डॉक्टरांचे मनोबल कमी झाले आहे. बाबा रामदेव नेहमीच रोग आणि त्यांच्या उपचारांबद्दल अवैज्ञानिक दावे करत आले आहेत. ते कर्करोग बरा करण्याचा दावा करतात. जर असं असेल तर या शोधाबद्दल त्याला नोबेल पारितोषिक मिळावं, असे आयएमए उत्तराखंडचे सचिव डॉ. अजय खन्ना म्हणाले.
रामदेव बाबा यांचे वादग्रस्त विधान -
रामदेव बाबा यांनी अॅलोपॅथी उपचार पद्धतीला मूर्खपणा असे म्हटले होते. अॅलोपॅथीच्या अपयशाबद्दलही त्यांनी भाष्य केले होते. ही उपचारपद्धती म्हणजे मूर्खपणा आणि वैज्ञानिक दिवाळखोरी आहे. कोरोनावर उपचारामध्ये हायड्रोक्लोरिक्विन फेल झालं. नंतर प्लाझ्मा थेरपी, रेमडेसिव्हीर इंजेक्शन, फॅबिफ्लू फेल ठरलं. लाखो लोकांचा मृत्यू अॅलोपॅथीचा उपचार घेतल्यामुळे झाला आहे. जेवढ्या रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन न मिळाल्यानं आणि रुग्णालयात न गेल्यामुळे झाला. त्यापेक्षा जास्त रुग्ण अॅलोपॅथी उपचार मिळाल्यानंतरही मृत्युमुखी पडले. त्यामुळे आता अनेक मुत्यूचे कारण अॅलोपॅथिक उपचार पद्धती आहे, असे ते म्हणाले होते. यावर वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी आपले वक्तव्य मागे घेतले. या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे ते म्हणाले होते. यानंतर त्यांनी टि्वट करत आयएमएला २५ प्रश्न विचारले होते. त्याच रामदेव बाबांचा आणखी एक डॉक्टरांची 'टर' उडवणारा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
हेही वाचा - व्हॉट्सअॅपचे केंद्र सरकारला आव्हान; दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल