नवी दिल्ली - 'बाबा का ढाबा' बंद करून रेस्टॉरंट सुरू केलेल्या कांता प्रसाद यांच्यावर ते बंद करण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनच्या काळात त्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे आता कांता प्रसाद यांनी पुन्हा दिल्लीतील आपल्या जुन्या जागेत व्यवसाय सुरु केला आहे. तसेच यूट्यूबर गौरव वासनसोबत गैरव्यव्हार केल्याबद्दल कांता प्रसाद यांनी माफी मागितली. यावर यूट्यूबर गौरव वासनने प्रतिक्रिया दिली. मी त्यांना माफ केलं असून पुन्हा मदत करण्यासाठी तयार आहे, असे तो म्हणाला.
कोरोनामुळे बर्याच लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या भेडसावत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘बाबा का ढाबा’ चे मालक कांता प्रसाद यांचेही कोरोनाव्हायरसमुळे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी फूड ब्लॉगर गौरव वासनने कांता प्रसाद यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. व्हिडीओमध्ये कांता प्रसाद रडताना दिसत होते. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता. त्यानंतर हा धाबा चालवणाऱ्या दोन वयोवृद्ध कांता प्रसाद आणि त्यांची पत्नी बदामी देवीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी लोकांनी मदतीचा हात पुढे केला.
कोरोनामुळे रेस्टॉरंट पडलं बंद...
बॉलिवूड आणि बर्याच मोठ्या सेलिब्रिटींनीही चांगली रक्कम दान केली. सर्वांच्या मदतीने कांता प्रसाद यांनी स्वतःचे एक नवीन रेस्टॉरंट उघडले. परंतु, कोरोनामुळे, त्याचे हे नवीन रेस्टॉरंट फार काळ टिकू शकले नाही. ग्राहकांची संख्या कमी होत गेली. ज्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर एका वर्षात कांता प्रसाद यांना दक्षिण दिल्लीतील मालवीय नगरमधील रेस्टॉरंट बंद करुन जुन्या ढाब्यावर परतावे लागले आहे. पैशांवरूनकांता प्रसादचा यू ट्यूबबर गौरव वासनशी वाद झाला होता आणि कांता प्रसाद यांनी गौरवविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता. यासंपूर्ण प्रकरणावर कांता प्रसाद यांनी दिलगिरी व्यक्त केली.
गौरवची प्रतिक्रिया...
कांता प्रसाद यांच्या दिलगिरीबद्दल गौरवने प्रतिक्रिया दिली. बाबांशी आपले कोणतीही वैर नाही. मी त्यांच्यापेक्षा लहान असून वृद्धांचा आदर करतो. मी त्याना कधीच फसवले नाही, असे त्याने सांगितले. अजूनही त्यांना मदत करण्यास मी तयार आहे. कारण, मदत करणे ही काही चुकीची गोष्ट नाही, असेही तो म्हणाला.