नवी दिल्ली - माझ लग्न करून द्या, उंची कमी असल्यामुळे लग्न जमत नाहीये, अशी तक्रार घेऊन एका व्यक्तीने चक्क पोलीस स्टेशन गाठलं होतं. ही गोष्ट सोशल मीडियावरती वाऱ्यासारखी पसरल्यानंतर त्यांच्यासाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव आले आहेत. यूपीच्या शामली जिल्ह्यात हा प्रकार घडला होता. 26 वर्षीय अजीम मंसूरी असे त्यांचे नाव आहे. अजीम फक्त दोन फूट, तीन इंच उंच आहे.
अजीम मंसूरी हे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून लग्नासाठी मुलगी शोधत आहेत. यासाठी त्यांनी आतापर्यंत अनेक अधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच अखिलेश यादव आणि योगी आदित्यानाथ यांनाही त्यांनी लग्नासाठी वधू शोधण्याची विनंती केली. मात्र, मुलगी मिळत नसल्याने त्यांनी अखेर पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांना मला वधू शोधा, अशी विनंती केली. कुटुंब आपल्या लग्नासाठी योग्य सहकार्य करत नसल्याचं म्हटलं.
व्हिडिओ व्हायरल झाला अन्....
अजीम यांच्या उद्वीग्न अस्थेचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर वेगाने व्हायरल झाला आणि परिस्थितीच बदलली. अजीम यांच्यासाठी लग्नासाठी अनेक प्रस्ताव आले आहेत. अमरोहा, गाझियाबाद, मेरठ, थानाभवन आणि दिल्ली येथून लग्नाचे प्रस्ताव येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना वधूच्या घरच्यांकडून कोणतीही अपेक्षा नसून फक्त सुशिक्षीत मुलगी हवी आहे.
उंची कमी असल्याने लग्नास नकार -
उत्तर प्रदेशातील शामलीमध्ये राहणारे अजिम एक कॉस्मेटिक शॉप चालवतात. त्यांची कमाई देखील ठिकठाक आहे. अजिम सहा भावा-बहिणींमध्ये सर्वांत लहान आहेत. त्यांची उंची कमी असल्यामुळे त्यांना त्रासाला सामोरे जावे लागेल. शाळेत मुले त्यांना उंचीवरुन चिडवायची त्यामुळे त्रासून त्यांनी आपलं शिक्षण अर्धवट सोडलं. आपल्या भावासोबत कॉस्मेटिक शॉपमध्ये बसू लागले. वयाची 21 वी पार केल्यानंतर त्यांच्या आईने त्यांना मुलगी शोधण्यास सुरवात केली. अनेक स्थळं येत. मात्र उंचीमुळे नकार मिळायचा. जोडीदार हवा असून रात्रभर झोपू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.
पत्नीला हजला घेवून जाण्याची इच्छा -
लग्न झाल्यानंतर ते आपल्या पत्नीला ते प्रेमाने एलिया नावाने संबोधणार आहेत. तसेच पासपोर्ट बनवणार असून ते तिला उमरे आणि हजला घेवून जाणार आहेत. तसेच गोवा, शिमलासह इतर ठिकाणींही पत्नीला घेवून जाण्याची त्यांची इच्छा आहे.
हेही वाचा - ममता बॅनर्जी यांचा वैद्यकीय अहवाल सार्वजनिक करावा; भाजपाची मागणी