नवी दिल्ली - आसाम विधानसभा निवडणुकांचा बिगूल वाजला असून राजकीय पक्षांनी प्रचार मोहिमेस सुरूवात केली आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी उद्यापासून (सोमवार) म्हणजेच १ मार्चपासून प्रचार मोहिमेचा नारळ फोडणार आहेत. आसाम विधानसभेच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यातील मतदान २७ मार्चला होणार आहे. तर ६ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
आसाममध्ये काँग्रेसचे शक्तीप्रदर्शन -
भाजपा, काँग्रेसह सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू केली आहे. प्रियंका गांधी प्रचाराच्या पहिल्या दिवशी आसाम दौऱ्यावर जाणार असून शक्तीप्रदर्शन करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २ मार्चला प्रियंका गांधी तेजपूर येथे सभेला संबोधित करणार आहेत. आसाम बरोबरच आणखी एका राज्यात त्या प्रचार मोहीम सुरू करणार आहेत.
आसाम निवडणुकांत सीएए मुद्दा गाजणार -
केरळच्या काँग्रेस महासचिवांनी पत्र लिहून प्रियंका गांधींनी प्रचार मोहिमेच्या तारखा मागितल्या आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही नुकसाच आसाम दौरा केला आहे. या निवडणुकीत काँग्रेस नागरिकत्व सुधारणा कायद्याचा मुद्दा उठवले, असे ते म्हणाले. सीएए कायद्याविरोधी उपरणेही राहुल गांधी यांनी गळ्यात घातले होते. आसाम कराराचाही त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला होता. काहीही होऊ, सीएएला विरोध कायम राहील, असे राहुल गांधी म्हणाले.
मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी पत्रकार परिषद घेत पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर केल्या. आसाममध्ये 126 विधानसभा मतदारसंघासाठी तीन टप्प्यात मतदान होणार. पहिला टप्पा 27 मार्च, दुसरा टप्पा 1 एप्रिल आणि तिसरा टप्प्यातील मतदान 6 एप्रिलला पार पडेल. सध्या आसाममध्ये भाजपा सत्तेत असून काँग्रेसने ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रँटशी आघाडी केली आहे.