गुवाहाटी (आसाम) - मानव आणि जंगली हत्ती यांच्यातील संघर्ष ही काही नवी गोष्ट नाही. वेगाने नष्ट होणारी जंगले आणि भोजनाच्या कमतरतेमुळे आसाममध्ये मनुष्य आणि हत्तींच्या संघर्षात वाढ झाली आहे. हा वाढता संघर्ष कमी करण्यासाठी आसामच्या नागांव जिल्ह्यातील वन्यप्रेमी बिनोद दुलु बोरा आणि त्यांच्या पत्नी मेघना मयुरी हजारिका हे भातपिकाची शेती करत आहेत. तसेच नवीन झाडे लावत आहेत. जेणेकरून जंगली हत्तींनी अन्नासाठी मानवी वस्तींवर हल्ला करू नये. बोरा यांनी स्थानिकांच्या मदतीने 'हाथी बंधू' नावाने एक संघटना स्थापन केली आहे. ही संघटना २०१८पासून त्या भागात झाडे लावण्यासह भातपिकाची शेती करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. पाहुयात या हत्तीप्रेमी दाम्पत्याची कहाणी..
या प्रकल्पामुळे हत्तींचे मानवी वस्तीत येण्याचे प्रमाण झाले कमी -
आसामच्या वनविभागानेही हाथी बंधू संघटनेला मदत केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून अन्नाच्या शोधात मानवी वस्तीत येणाऱ्या हत्तींची संख्या कमी झाली आहे. बोरा यांना ही संघटना स्थापन करण्यासाठी तसेच ही मोहीम योग्य दिशेने नेण्यासाठी वरिष्ठ नागरिक प्रदीप भुयान यांची चांगली मदत झाली.
पत्नीचे सहकार्य -
बिनोद दुलु बोरा यांच्या या उपक्रमाला त्यांची पत्नी मेघना मयुरी हजारिका यांचे सहकार्य मिळाले. त्यांनी लावलेल्या भातपिकाच्या शेतामध्ये हत्ती रात्री येतात, आणि सकाळ होताच ते जंगलात निघून जातात. बिनोद दुलु बोरा आणि हाथी बंधुच्या या उपक्रमानंतर हत्ती आणि मानवामधील संघर्षाच्या घटना कमी झाल्या आहेत. हत्ती भातपीक आणि गवत पोटभर खातात आणि जंगलात निघून जातात. ज्या शेतकऱ्यांना आधी हत्तींचा त्रास होता त्या शेतकऱ्यांनी आता सुटकेचा निश्वाःस सोडला आहे. हाथी बंधूंचा हा उपक्रम देशातील इतर भागातही मानव आणि हत्तींचा संघर्ष कमी करण्यासाठी एक आदर्श ठरू शकतो.