गुवाहाटी : आसाममधील पूरस्थिती पुन्हा एकदा गंभीर होत असून, राज्यात महापुराने विनाशकारी स्वरूप धारण केलंय. आसाम आणि शेजारच्या राज्यांमध्ये अलीकडच्या काळात झालेल्या मुसळधार पावसामुळे, ब्रह्मपुत्रा आणि तिच्या जवळपास सर्व प्रमुख उपनद्यांच्या पाण्याची पातळीत वाढ झालीय.
राज्यातील २१ जिल्हे पुरामुळे प्रभावित : राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मंगळवारी संध्याकाळी सांगितलं की, राज्यातील धेमाजी, लखीमपूर, दिब्रुगड, विश्वनाथ, चिरांग, गोलाघाट, दारंग, धुबरी, जोरहाट, माजुली, मोरीगाव, नागाव, नलबारी, सिबसागर, सोनितपूर, तामुलपूर, ओदलगुरी, कामरूप महानगरपालिका, कोक्राझार इत्यादी एकूण २१ जिल्हे पुरामुळे प्रभावित आहेत. विविध जिल्ह्यांत सुमारे ३७,४८९ लोकांना पुराचा फटका बसलाय. तर केवळ धेमाजीमध्ये ४०,०० हून अधिक लोक प्रभावित आहेत. पुरामुळे आत्तापर्यंत १५ जणांचा मृत्यू झालाय.
२१ हजार हेक्टरहून अधिक शेतजमिनीला पुराचा फटका : ब्रह्मपुत्रा नदी सध्या दिब्रुगड, निमातीघाट, तेजपूर, गुवाहाटी आणि धुबरी येथे धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहे. बेकी, जिया भराली, दिचांग, डिखाऊ आणि सोवनसिरी या प्रमुख नद्याही अनेक ठिकाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. पुरामुळे राज्यातील तब्बल ७५६ गावं प्रभावित झाली आहेत. आतापर्यंत राज्यातील २१ हजार हेक्टरहून अधिक शेतजमिनीला पुराचा फटका बसला असून, २ लाख ६९ हजार पशुधन बाधित झाले आहे. दरम्यान, विविध नद्यांना आलेल्या पुरामुळे चिरांग, ओदलगुरी, सोनितपूर, नलबारी, तामुलपूर आणि विश्वनाथ जिल्ह्यातील रस्ते, पूल आणि धरणांचं नुकसान झालंय.
पुढील तीन ते चार पावसाची शक्यता : आसामसह ईशान्येकडील राज्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवस मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राज्य हवामान विभागाने वर्तवली आहे. ब्रह्मपुत्रेच्या वाढत्या पातळीमुळे नदीतील फेरी सेवा बंद करण्यात आलीय. निमती घाट आणि माजुली दरम्यानची फेरी सेवा नद्यांच्या पाण्याची पातळी वाढल्याने बंद करण्यात आली आहे. तसेच पुराच्या पाण्यामुळे काही ठिकाणी बंधाऱ्याला तडे गेल्याची माहितीही प्राप्त झालीय. पुरामुळे रस्ते, पूल, विद्युत खांब आणि शाळांसह इतर वास्तूंचेही अतोनात नुकसान झालंय.
हेही वाचा :