मछलीपट्टणम (आंध्र प्रदेश) - आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणममध्ये एका मुलाचा मृतदेह दुचाकीवरून घेऊन गेल्याच्या घटनेने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मृतदेह दुचाकीवरून घेऊन जातानाचे दृश्य धक्कादायक होते. मृतकाचे काका ढसाढसा रडत होते. कृष्णा जिल्ह्यातील गुडूर जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकणारा नवीन हा रविवारी मांगीनपुडी समुद्रकिनारी गेला होता तेव्हा तो वाहून गेला त्यातच त्याचा मृत्यू झाला.
तो समुद्रात पोहत होता आणि याच दरम्यान तो वाहून गेला. मृताच्या काकांनी सांगितले की नवीनचा मृतदेह पेडापट्टणमच्या किनाऱ्यावर सापडला. त्याला दुचाकीवरून शवागारात नेण्यात आले होते. त्यांनी सांगितले की, मृतदेह समुद्रकिनाऱ्यावरून नेण्यास अधिकाऱ्यांनी प्रतिसाद न दिल्याने त्यांनी मृतदेह दुचाकीवर नेला.