नवी दिल्ली : बुधवारी रात्री पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. यावेळी झालेल्या चकमकीत भारताचा एक जवान हुतात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू-काश्मीरच्या सुंदेरबानी सीमेजवळ ही चकमक झाली होती.
सुरक्षा विभागाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीत हुतात्मा झालेले लक्ष्मण हे जोधपूरच्या बिलादा तालुक्यातील रहिवासी होते. चकमकीदरम्यान गोळी लागल्याने ते जखमी झाले होते. त्यानतंर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांना वीरमरण आले. यानंतर यावर्षी पाकिस्तानच्या गोळीबारात हुतात्मा झालेल्या जवानांची संख्या चारवर गेली आहे.
यावर्षी जानेवारीच्या पहिल्या दिवसापासूनच पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यास सुरुवात केली होती. जानेवारीमध्ये झालेल्या सीमेवरील चकमकींमध्ये देशाचे तीन जवान हुतात्मा झाले आहेत.
गेल्यावर्षी पाच हजारांहून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन..
जम्मू-काश्मीरमध्ये २०२० साली पाकिस्तानकडून तब्बल ५,१०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. गेल्या १८ वर्षांमधील ही सर्वोच्च संख्या आहे. या आकडेवारीनुसार, वर्षामध्ये दररोज सुमारे १४ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले.
२०२०मध्ये एकूण 36 लोकांचा मृत्यू, १३० जखमी..
पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधीमध्ये गेल्या वर्षी एकूण १२ नागरिक आणि २४ जवान हुतात्मा झाले. तसेच, एकूण १३० लोक जखमी झाले होते. यामुळे २००३साली करण्यात आलेल्या शस्त्रसंधीचा उपयोगच काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा : अमली पदार्थ तस्करांच्या मागावर मध्यप्रदेश पोलीस; गुजरात, महाराष्ट्रातील गँगवर नजर