हैदराबाद Karanbir Singh Natt : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा इथं दहशतवाद्यांशी लढताना भारतीय सैन्य दलातील अधिकाऱ्याला गोळी लागली होती. चेहऱ्यावर ही गोळी लागल्यानं भारत मातेचा हा वीर जवान गेल्या 8 वर्षापासून कोमात होता. मात्र अखेर रविवारी या भारत मातेच्या वीर जवानाची प्राणज्योत अखेर मालवली आहे. लेफ्टनंट कर्नल करणबीर सिंग नट असं या भारत मातेच्या वीर जवानाचं नाव आहे. लेफ्टनंट कर्नल करणबीर सिंग नट हे 2015 पासून कोमात होते.
चेहऱ्यावर लागली होती दहशतवाद्यांची गोळी : जम्मू काश्मीरमधील कुपवाडा इथं दहशतावद्यांशी लढताना नोव्हेंबर 2015 मध्ये लेफ्टनंट कर्नल करणबीर सिंग नट यांना गोळी लागली होती. मात्र या हल्ल्यावेळी लेफ्टनंट कर्नल करणबीर सिंग नट यांनी दहशतवाद्यांचा खात्मा करुन आपल्या तीन साथिदारांना वाचवलं होतं. अतिशय धाडसी मोहीम राबवत लेफ्टनंट कर्नल करणबीर सिंग नट यांनी दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. मात्र त्यातच त्यांच्या चेहऱ्यावर दहशतवाद्यांची गोळी लागली होती. त्यामुळं ते गेल्या आठ वर्षापासून कोमात गेले होते.
कुपवाड्यातील हाजी नाका गावात घुसले होते दहशतवादी : जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हाजी नाका या गावात दहशतवादी घुसल्याची माहिती भारतीय सैन्य दलाला मिळाली होती. त्या माहितीवरुन भारतीय सैन्य दलातील जवानांनी हाजी नाका गावात शोधमोहीम राबवली. लेफ्टनंट कर्नल करणबीर सिंग नट हे 160 इन्फंट्री बटालियन टीए अर्थात जम्मू आणि काश्मीर रायफल्स बटालियनचे सेकंड-इन-कमांड होते. हाजी नाका गावात भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी 22 नोव्हेंबर 2015 रोजी दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. मात्र यातच लेफ्टनंट कर्नल करणबीर सिंग नट यांना दहशतवाद्यांची गोळी लागली होती. त्यामुळं ते कोमात गेले होते. लेफ्टनंट कर्नल करणबीर सिंग नट यांनी 20 वर्षे भारतीय सैन्य दलात सेवा बजावली होती. त्यामुळं त्यांचा सैन्य दलात चांगलाच दबदबा होता.
भारतीय सैन्य दलानं सेना मेडलनं केला होता गौरव : लेफ्टनंट कर्नल करणबीर सिंग नट यांनी चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमधून पदवी घेतली होती. त्यानंतर 1998 मध्ये ते सैन्यात दाखल झाले होते. भारतीय सैन्य दलातील शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून ते ब्रिगेड ऑफ गार्ड्सच्या 19 व्या बटालियनमध्ये नियुक्त झाले होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक धाडसी मोहिमा राबवल्या होत्या. त्यांच्या कर्तृत्वामुळंच भारतीय सेन्य दलानं त्यांना 'सेना मेडल' या सैन्य दलातील सन्मानाच्या पारितोषिकानं गौरव केला होता. मात्र 8 वर्ष मृत्यूशी झुंज देणाऱ्या या भारत मातेच्या सुपूत्राची झुंज अखेर संपली असून त्यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि वडील असा परिवार आहे, अशी माहिती भारतीय सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी सांगितलं.
हेही वाचा :