हैदराबाद - देशभरात सध्या कोरोनाचा कहर पाहायला मिळत रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनापासून आपला बचाव करण्यासाठी विविध उपाय करताना आढळून येत आहेत. कुठे अघोरी पूजा, तर कुठे आयुर्वेदीक औषधे तर अनेकांनी गोमूत्राने उपचाराचा दावा केला आहे. यातच आंध्र प्रदेशातील नेल्लोरच्या एका गावात आयुर्वेदीक औषधांसाठी लोकांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. या औषधापासून कोरोना बरा होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे या आयुर्वेदिक औषधाचा प्रभाव खरच पडतोय का, याची सत्यता तपासण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी आयसीएमआर सदस्यांची विशेष टीम पाठवली. या टीमने आयुर्वेदीक औषधाची तपासणी केली.
मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या सूचनेनुसार आयसीएमआर टीम आयुर्वेदिक औषधाच्या वैज्ञानिक निदानासाठी नेल्लूर येथे पोहचली. आयुर्वेदिक औषध बनवणाऱ्या झाडांची पाने आणि घटकांची तपासणी केली. तसेच आयसीएमआर पथकाने आनंदय्या यांच्याकडे औषधनिर्माण प्रक्रियेची चौकशी केली. दरम्यान उपाध्यक्ष व्यंकय्या यांनी आयसीएमआर आणि आयुष यांना आयुर्वेदिक औषधाचा अहवाल लवकरच सादर करावा, अशी सूचना केली. तसेच जोपर्यंत हे औषध कोरोनावर प्रभावी आहे, हे सिद्ध होत नाही, तोपर्यंत या औषधावर बंदी घालण्यात आली आहे.
बोगिनी आनंदय्या यांनी हे औषध तयार केले आहे. हे औषध घेण्यासाठी दूरवरून लोक या गावी येत आहेत. स्थानिक आमदार काकानी गोवर्धन यांनी आनंदय्या औषधाला पाठिंबा दिला आहे. हे औषध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. शेजारील राज्यांतूनही येथे मोठ्या प्रमाणावर लोक येत आहेत. हे औषध कोरोनापासून मुक्त करते, असा दावा आनंदय्या यांनी केला आहे. त्यांचा हा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही गर्दी पाहता शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेत यावर चर्चा केली. आयसीएमआर या औषधाची तपासणी करणार आहे. औषधांची तपासणी झाल्यानंतर औषध वाटप करण्याचा निर्णय सरकार घेईल.
औषध भलतंच प्रसिद्ध -
कोरोना उपचारासाठी आनंदय्या आयुर्वेदिक औषधाची मागणी वाढली आहे. औषध घेण्यासाठी नेल्लोर परिसरातील हजारो लोकांनी कृष्णापट्टणम येथे गर्दी केली. सुमारे 3 किमीपर्यंत लोकांच्या रांगा लागल्या होत्या. आनंदय्या हे औषध भलतंच प्रसिद्ध झाले आहे. मात्र दुसरीकडे, प्राधिकरणाने औषध वितरणासाठी परवानगी दिली नाही. आज आयुर्वेदिक औषधाचे वितरण थांबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी जाहीर केले आहे. यानंतर औषध न मिळाल्याने नागरिक घराकडे परतले.
असे केले तयार औषध -
आनंदय्या गेल्या काही वर्षांपासून औषधी वनस्पतींसह आयुर्वेदिक औषधे बनवत आले आहेत. अलीकडेच त्याने कोविडसाठी औषध विकसित केले. आले, खजूर गुळ, मध, काळी जिरे, मीरे, तेज पत्ता, लवंग,कडुलिंबाची पाने, अब्यांच्या रोपट्याची पाने,आवळा, यसिंथ पाने,खोकली पाने,रुईचे झाड, फुलांच्या कळ्या,काटेरी वांगे आदींचा वापर केला आहे.