नवी दिल्ली : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन क्वाड बैठकीसाठी भारतात आले आहेत. बैठकीत ते ऑस्ट्रेलिया, भारत आणि जपानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधत आहेत. दरम्यान, अमेरिकन दूतावासाने जारी केलेल्या एका व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. व्हिडिओमध्ये अँटोनी ब्लिंकन ऑटो चालवताना दिसत आहेत. याशिवाय परराष्ट्र मंत्री अँटोनी बिल्कन यांनीही काही छायाचित्रे शेअर केली आहेत. या फोटोंमध्ये ते रिक्षातून खाली उतरताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये ते म्हणत आहेत की, 'मी थोडासा उदास झालो आहे. माझ्याकडे वेळ असता तर मी भारतात आणखी काही काळ राहिलो असतो'.
मसाला चहाचीही चव घेतली : त्यासोबतच ब्लिंकन यांनी एकामागून एक अनेक छायाचित्रे ट्विट केली. तसेच त्यांनी मुंबई, हैदराबाद, कोलकाता, चेन्नई आणि दिल्ली येथील कर्मचाऱ्यांचेही आभार मानले. ते म्हणाले की, अमेरिका - भारत धोरणात्मक भागीदारी पुढे नेण्यासाठी तुम्ही महत्त्वाचे काम करत आहात. अनेक राज्यांतील अमेरिकन वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांचाही त्यांनी उल्लेख केला. तुमच्या मेहनतीबद्दल मी तुम्हा सर्वांचा ऋणी आहे, असे ते म्हणाले. दिल्लीतील वास्तव्यादरम्यान ब्लिंकन यांनी मसाला चहाची देखील चव घेतली. त्यांनी ट्विट केले की, त्यांनी मसाला चायच्या फ्लेवर्ससह भारतातील प्रतिभावान महिलांशी संवाद साधला. ते म्हणाले की, भारतात महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे काम केले जात आहे.
'भारतासोबत भागिदारी सुरुच राहणार' : क्वाड बैठकीनंतर ब्लिंकेन म्हणाले की, 'इंडो - पॅसिफिक प्रदेश भविष्यासाठी महत्त्वाचा आहे'. ते म्हणाले की, या प्रदेशात आमची भागीदारी पूर्वीसारखीच व्यापक आणि खोल आहे. क्वाड आणि इतर माध्यमातून ही भागीदारी सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन आणि ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वोंग जी 20 बैठकीत सहभागी होण्यासाठी भारतात आले आहेत. तर जपानचे परराष्ट्र मंत्री हयाशी फक्त क्वाड मीटिंगला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीत आले आहेत. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, आमची आजची बैठक मुक्त आणि सर्वसमावेशक इंडो - पॅसिफिक क्षेत्राला समर्थन करते.
हेही वाचा : CJI On Fake News : फेक न्यूजच्या जमान्यात सत्याचा बळी गेला - सरन्यायाधीश चंद्रचूड