शामली - उत्तर प्रदेशच्या शामलीमध्ये आरोग्य विभागाचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याच्या ऐवजी आरोग्य कर्मचाऱ्यांनी तीन वृद्ध महिलांना अँटी रेबीज लस टोचवल्याची घटना घडली आहे. एका वृद्ध महिलेची तब्येत बिघडल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. महिलेच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात गोंधळ घातल्यानंतर आरोग्य विभागाने चौकशी सुरू केली आहे.
जिल्ह्यातील कंधळा येथे एक सामुदायिक आरोग्य केंद्र आहे. कंधला भागातील मोहल्ला सरावज्ञान येथील तीन महिला कोरोना लस घेण्यासाठी आरोग्य केंद्रात पोहचल्या. सरोज बाला (70), अनारकली (72) आणि सत्यवती (62) अशी तीघींची नावे आहेत. या तीन्ही महिलांना आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांना न विचारताच कोरोना लसी ऐवजी अँटी रेबीज लस टोचवली. आपल्याला कोरोनाची नाही, तर अँटी रेबीज टोचवल्याची माहिती महिलांना नव्हती. कोरोनाची लस घेतली असे समजून तिघीही आरोग्य केंद्रावर डोस घेतल्यानंतर घरी परतल्या. यातील सरोज बाला यांची घरी गेल्यानंतर प्रकृती बिघडली. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॅाक्टरांनी लसीबाबत माहिती विचारल्यानंतर त्यांना आरोग्य केंद्रातून दिलेली चिठ्ठी दाखविण्यात आली. त्यावर अँटी रेबीज लस लिहिल्याचे पाहून त्यांना धक्का बसला आणि संपूर्ण प्रकरण समोर आले. लसीकरणादरम्यान गंभीर दुर्लक्ष झाल्याने ही घटना घडली. ही घटना चिंताजनक असून अनेक कोरोना केंद्रात आरोग्य कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा समोर येत आहे.
आरोग्य विभागाचे दुर्लक्ष उघडकीस आल्यानंतर वृद्ध महिलांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात गोंधळ घातला. कुटुंबीयांनी डॉ संजय अग्रवाल यांच्याकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे. तीन्ही महिलांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास अहवाल समोर आल्यानंतर जो दोषी आढळेल त्याच्याविरूद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे डीएम जसजीत कौर यांनी सांगितले.
नर्सनं महिलेला दोनदा दिली कोरोना लस -
कानपूरच्या देहात गावामध्ये मोबाईलच्या नादात व्यक्ती काय करू शकतो, याच मुर्तीमंत उदाहरण समोर आले होते. कोरोना लसीकरण केंद्रात एक परिचारिका फोनवर बोलत होती. फोनवर बोलता-बोलता परिचारिकने कोरोना लसीचा डोस घेण्यासाठी प्रतिक्षेत असलेल्या एका महिलेला दोनदा लस टोचवली होती. . या घटनेनंतर महिलेच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला. मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संबंधित महिला परिचारिकेवर कारवाई करण्याचे आदेश दिले.
हेही वाचा - कोयत्याचा धाक दाखवत फुकटात जेणाऱ्या गुंडांच्या लेडी सिंघमने आवळल्या मुसक्या