नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित बीबीसी डॉक्युमेंटरी बुधवारी जामिया मिलिया इस्लामिया सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये दाखवली जाणार आहे. याबाबतचे निमंत्रण पत्र सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. SFI संघटनेने ट्विटरवर पॅम्प्लेट्स शेअर केले आहेत. येथील गेट क्रमांक ८ वर सायंकाळी सहा वाजता एकत्र येण्याचे आवाहन त्यात करण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर आज विद्यापीठाच्या कॅम्पस परिसरात मोठ्या संख्येने सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.
पोलिसांनी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्याचा आरोप: एसएफआयचा आरोप आहे की, दिल्ली पोलिसांनी त्यांच्या काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे एसएफआयचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, त्यांनी धरणे निदर्शनाची घोषणा देखील केली आहे. बीबीसीने पीएम मोदींवर बनवलेला डॉक्युमेंट्री दाखवण्यावर भारत सरकारने बंदी घातली आहे. देशभरात अनेक ठिकाणी ही डॉक्युमेंटरी दाखवण्यात येत असल्याने राजकीय वातावरण तापत आहे.
मोठ्या प्रमाणावर निदर्शने करण्याचा इशारा: एसएफआयकडून सोशल मीडियावर माहिती शेअर करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, जामियाचे विद्यार्थी अझीझ, नैवेद्य, अभिराम आणि तेजस यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंगला परवानगी देणार नाहीत. त्यामुळेच या दडपशाहीविरोधात सर्वजण जामियामध्ये पोहोचत आहेत. दुपारनंतर मोठी निदर्शने करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, विद्यार्थ्यांची कामगिरी पाहता पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.
काल रात्री जेएनयूमध्ये झाला गोंधळ: दुसरीकडे काल रात्री जेएनयूमध्ये बीबीसी डॉक्युमेंटरी दाखवण्यावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली. परिस्थिती इतकी तणावपूर्ण बनली की, विद्यार्थ्यांनी एकमेकांवर दगडफेक सुरू केली. आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. त्याचवेळी जेएनयू स्टुडंट्स युनियनच्या अध्यक्षा ऐशी घोष यांनी आज बीबीसीच्या माहितीपटाचे स्क्रीनिंग दाखवणार असल्याचे सांगितले आहे. याच मुद्द्यावर, निवृत्त न्यायाधीश, निवृत्त नोकरशहा आणि सेवानिवृत्त सशस्त्र दलातील दिग्गजांनी बीबीसीचा माहितीपट दिशाभूल करणारा असल्याचे म्हटले आहे.
काय आहे प्रकरण: ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (BBC), यूकेने 2002 च्या गुजरात दंगली दरम्यान गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळावर टीका करणारी दोन भागांची मालिका प्रसारित केली होती. आता केंद्र सरकारने डॉक्युमेंट्रीवर नाराजी व्यक्त केल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून व्हिडीओ हटवण्यात आला. या मालिकेमध्ये पंतप्रधान मोदींच्या विरोधात अनेक चुकीच्या बाबी दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.