नवी दिल्ली - माजी लष्करप्रमुख आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात सीडीएस बिपीन रावत ( Bipin Rawat passes away ) यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर देशाच्या पुढील सीडीएसची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी सध्याचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचे नाव समोर येत आहे.
सेवाज्येष्ठतेचे नियमांनुसार जनरल मनोज मुकुंद नरवणे, नॉर्दन आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल योगेश कुमार जोशी किंवा लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल चंडी प्रसाद मोहंती हे दावेदार आहेत. लेफ्टनंट जनरल जोशी हे भारतीय हवाई दल आणि नौदल प्रमुख या दोन्हींमध्ये वरिष्ठ आहेत.
मनोज मुकुंद नरवणे यांनी 31 डिसेंबर 2019 रोजी जनरल बिपिन रावत यांच्याकडून भारताच्या सैन्याचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. नरवणे यांना एप्रिल 2022 पर्यंत लष्काराचा कारभार पाहावा लागणार आहे. तीन लष्कर प्रमुखांपैकी एकाचे नेतृत्व केले असलेल्या व्यक्तीची सीडीएसपदी नियुक्ती केली जाते. सेवा प्रमुखांचा कार्यकाळ तीन वर्षे किंवा वयाच्या 62 वर्षापर्यंत असू शकतो, तर सीडीएसचा कार्यकाळ अनिश्चित असतो.
तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले होते. या हेलिकॉप्टरमधून (Army Chopper Crash) बिपीन रावत हे पत्नीसह प्रवास करत होते. यावेळी दोघांचाही मृत्यू झाला. त्यांच्यासह या दुर्घटनेत एकूण 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तामिळनाडूच्या कुन्नूर येथील जंगलात ही दुर्घटना घडली. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.
बिपीन रावत यांच्याबद्दल -
डिसेंबर 2019 मध्ये बिपीन रावत सेनादलातून निवृत्त होणार होते. ते निवृत्त होण्यापूर्वी नरेंद्र मोदी सरकारने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाची निर्मिती करुन त्यांना त्या पदावर काम करण्यासाठी संधी दिली होती. 16 मार्च 1958 मध्ये बिपीन रावत यांचा जन्म झाला. त्यांचे वडील एल एस रावत सैन्यात होते. लेफ्टनंट जनरल एल एस रावत म्हणून त्यांची ख्याती होती. बिपीन रावत यांचे बालपण सैनिकांच्या सहवासातच गेले. शिमल्याच्या सेंट एवडर्ड स्कूलमधून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले.
हेही वाचा - Bipin Rawat passes away : सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन