नवी दिल्ली - भारत आणि फ्रान्समध्ये राजस्थानातील जोधपूरमध्ये राफेल विमानांचा युद्धसराव होणार आहे. भारताने अत्याधुनिक अशी राफेल लढाऊ विमाने फ्रान्सकडून खरेदी केली आहेत. भारत-चीन सीमावाद सुरू असताना राफेल विमानांच्या युद्धसरावाने चीनला चांगलीच चपराक बसली आहे. स्कायरॉस (SKYROS) असे या युद्धसरावाचे नाव ठेवण्यात आले आहे.
राफेल लढाऊ विमानांसोबत सुखोई घेणार झेप -
जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात हा युद्धसराव होणार आहे. या सरावासाठी फ्रान्समधून राफेल लढाऊ विमाने भारतात येणार आहेत. भारतीय राफेल आणि सुखोई ही लढाऊ विमाने युद्धसरावात भाग घेणार असल्याची माहिती सरकारी सुत्रांनी दिली. राफेल विमानांचा सहभाग असलेला हा पहिला सर्वात मोठी युद्धसराव आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्यात राफेल भारतीय हवाई दलात दाखल झाले आहेत. ३६ राफेल विमानांची भारताने ऑर्डर दिली असून त्यातील काही विमाने येणे बाकी आहे. भारत आणि फ्रान्समध्ये मागील १० वर्षांपासून गरुडा हा युद्धसराव करण्यात येतो. त्यापेक्षा राफेल विमानांचा युद्धसराव वेगळा असणार आहे. चीनसोबत ताणलेले संबंध आणि पाकिस्तानच्या सततच्या कारवाया सुरू असताना राफेलच्या युद्धसरावाला महत्त्व आले आहे.
राफेल विमाने लडाख सीमेवरही तैनात -
मागील वर्षी जुलै महिन्यात फ्रान्ससोबत झालेल्या युद्धसरावात भारताच्या सुखोई विमानांनी सहभाग घेतला आहे. लडाखमधील चीनसोबतच्या वादाच्या पाश्वभूमीवर भारताने राफेल विमाने तैनात ठेवली आहेत. युद्धात अद्याप या विमानांचा वापर झाला नाही. त्यामुळे राफेल विमानांचा हा सराव भारतासाठी फायद्याचा ठरणार आहे.