जयपूर : राजस्थानमध्ये कोरोना लसीकरणाबाबत सरकारचा निष्काळजीपणा दिवसेंदिवस वाढत चाललेला दिसून येत आहे. यापूर्वी लसी वाया गेल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उदयपूर जिल्ह्यामध्ये एक रुग्णवाहिका चालकच नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देताना दिसून आला आहे.
उदयपूरमधील सायरा आरोग्य केंद्रामध्ये हा प्रकार समोर आला आहे. महेंद्र लोहार नावाचा रुग्णवाहिका चालक लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देत होता. लोकांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे याची तक्रार केली. यानंतर घटनास्थळी दाखल होऊन, वैद्यकीय अधिकारी राम सिंह यांनी महेंद्रला आरोग्य केंद्राबाहेर काढले. हा प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू होता, असेही सांगण्यात येत आहे.
चालकाला आता बाहेर काढले असले, तरी त्याला लस देण्याची परवानगी दिली कोणी? असा प्रश्न आता नागरिक व्यक्त करत आहेत. बीसीएमओ डॉ. ओ. पी. रामपुरिया यांनी लोकांच्या तक्रारीवरुन महेंद्रला या आरोग्य केंद्रामध्ये येण्यास मज्जाव केला आहे. तसेच, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. बीएमसीओ स्तरावर यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत या चालकावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
हेही वाचा : खासगी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना ७५ टक्के आरक्षण; हरियाणा सरकारने जारी केली अधिसूचना