पणजी: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गोवा विधानसभा निवडणुकीत (Rahul Gandhi on Goa Election) विजय मिळविणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. गोवा विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसशिवाय कोणीही सत्ता स्थापन करू शकणार नाही, असा दावा त्यांनी केला. गोव्यातील गरिबांना महिना 6 हजार रुपये देऊ, असे आश्वासनही त्यांनी जाहीर प्रचारसभेत दिले आहे.
भक्कम बहुमत मिळेल- राहुल गांधी
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, की यावेळी आम्हाल भक्कम बहुमत मिळेल. गोव्यात सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही त्वरित कृती करू.गोवा विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सभा घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गोव्यातील निवडणुकीविषयी मत व्यक्त केले आहे. यावेळी आम्हाल भक्कम बहुमत मिळेल. गोव्यात सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही त्वरित कृती करू असेही काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी म्हटले आहे. सत्तेत आल्यानंतर कायदेशीर मार्गाने आणि शाश्वरत पद्धतीने खाणी पूर्ववत सुरू करण्याचे आमचे नियोजन आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांचा पुन्हा हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, की गोवा मुक्तीसंग्रामला उद्धवस्त करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. गोव्याला स्वातंत्र्य मिळण्यास काँग्रेसमुळे उशीर झाला. काही तासांचे काम मात्र, त्याला 15 वर्षे लागले. गोव्यातील लोकांना स्वातंत्र्यासाठी संघर्ष करावा लागला. सत्याग्रह करावा लागला. काँग्रेसने गोव्यातील जनतेला स्वातंत्र्यासाठी मदत केली नाही. गोव्याच्या स्वातंत्र्यासांठी सैनिक पाठविणार नसल्याचे देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी लाल किल्ल्यावरून भाषणातून सांगितले होते. ही काँग्रेस तुम्हाला मते मागत आहे, असा टोला पंतप्रधा नरेंद्र मोदींनी काँग्रेसला लगावला. तसेच सत्ता स्थापनेचा दावा केला.
गोव्यातील आमदार जातात - केजरीवाल
गोव्यात मुख्यमंत्री होण्यासाठी घोडेबाजार सुरू झाला होता. त्यासाठी प्रत्येक आमदारांचा दर ठरविला जात होता. हा दर 10 करोडपासून ते 100 करोड पर्यंत असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला. इतर पक्षातून निवडून आलेले आमदार भाजपाला सत्तेत साथ देण्यासाठी प्रत्येकी 100 कोटीत विकले गेले, असा आरोप त्यांनी केला. तुमच्या मुलांच्या आणि गोव्याच्या भविष्यासाठी या विधानसभा निवडणुकीत आपला मतदान करा. कृपया यावेळी तुमच्या पक्षाकडे दुर्लक्ष करा, असे आवाहन त्यांनी केले आहे. सध्याचे गोवा सरकार घोटाळ्यात अडकले आहे. आमदार भ्रष्ट आहेत. कामगार घोटाळा, नोकरी घोटाळ्यात अडकलेले मंत्री आहेत. 'आप'कडे राज्याच्या विकासाचे व्हिजन आहे. तर काँग्रेस, भाजपकडे कोणताही अजेंडा नाही. पहिल्यांदा राज्यात एक प्रामाणिक पक्ष येत आहे, असे सांगत केजरीवाल यांनीही सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.