अहमदाबाद (गुजरात) - अहमदाबादमधील साबरमती रिव्हरफ्रंट ते गुजरातच्या केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंतची सी-प्लेन सेवा देखभालीसाठी सुमारे तीन आठवड्यांसाठी स्थगित करण्यात आल्याची माहिती स्पाइसजेटने दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 31 ऑक्टोबर रोजी भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सी-प्लेनचे उद्घाटन करण्यात आले होते. परंतु एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत ही सेवा स्थगित करण्यात आली आहे. अहमदाबाद येथील विमान दुरुस्ती केद्र अद्याप निर्माणाधीन असल्याने ही विमाने मालदीव येथे दुरूस्ती करिता पाठविण्यात येत आहे. त्यामुळे विमान परत आल्यावर १५ डिसेंबर पुन्हा ही सेवा सुरू होईल, असे स्पाइसजेटने सांगितले आहे.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले होते उद्घाटन -
31 ऑक्टोबर भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सी-प्लेनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. मोदींनी येथून सरदार सरोवर धरणाजवळील तलाव -3 येथून विमान प्रवास करत सेवेचे उद्घाटन केले होते. उद्घाटनापूर्वी मोदींनी या सेवेचा तपशीलही घेतला होता.
ही आहे सी-प्लेनची वैशिष्टे -
सी-प्लेन हे अहमदाबाद ते केवडिया हे 200 किमीचे अंतर केवळ 40 मिनिटांत पार करू शकते. या सी-प्लेन मध्ये 19 जणांना बसण्याची क्षमता असून हे सी-प्लेन 300 मीटरच्या धावपट्टीवर उड्डाण घेण्यास सक्षम आहे. या सी-प्लेनची दररोज अहमदाबाद ते केवडिया या मार्गावर 8 उड्डाणे होत असून प्रवास करण्यासाठी एका प्रवाशाला 4 हजार 800 रुपयांचे तिकीट काढावे लागते. हे सी-प्लेन चालविण्याकरिता विदेशी तज्ज्ञांकडून भारतीय वैमानिकांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले असून हा सी-प्लेन प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.