नवी दिल्ली Agniveer Amritpal : अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय सैन्यात अग्निवीर म्हणून भरती झालेला पंजाबचा रहिवासी अमृतपाल सिंग 11 ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ मृत्यू झाला होता. त्यांचं पार्थिव सैन्यदलाच्या वाहनाऐवजी खासगी रुग्णवाहिकेतून आणण्यात आल्याचा आरोप काँग्रेस पक्षानं केलाय. हा देशातील हुतात्म्यांचा अपमान आहे. देशासाठी हुतात्मा झालेल्या अमृतपाल सिंग यांना सैन्याच्या सन्मानानं अंतिम निरोपही देण्यात आला नसल्याचा काँग्रेसनं आरोप केला. या आरोपांबाबत सैन्यदलाकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय.
- सैन्याचं स्पष्टीकरण : एक्सवरील एका पोस्टमध्ये, सैन्यानं म्हटलंय की, अग्नीवीर अमृतपाल सिंग यांचा 11 ऑक्टोबर 2023 रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. अग्निवीर अमृतपाल सिंग यांच्या दुर्दैवी मृत्यूशी संबंधित काही गैरसमज आणि चुकीचं वर्णन करण्यात आलंय. अग्निपथ सैनिकांमध्ये फरक करत नसल्याचं सैन्यदलानं संगितलं.
अमृतपाल सिंग यांनी केली आत्महत्या : सैन्याच्या नगरोटा-मुख्यालय असलेल्या व्हाईट नाईट कॉर्प्सनं सांगितलं की, राजौरी सेक्टरमध्ये सेन्ट्री ड्युटीवर असताना स्वत:ला लागलेल्या गोळीमुळे सिंग यांचा मृत्यू झाला. अग्निवीर अमृतपाल सिंग यांनी ड्युटीवर असताना आत्महत्या केलीय. यामुळं कुटुंब आणि भारतीय सैन्याचं मोठं नुकसान असल्याचं सैन्यानं आपल्या निवेदनात म्हटलंय. सध्याच्या प्रथेच्या अनुषंगानं, वैद्यकीय-कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर, अंत्यसंस्कारासाठी एस्कॉर्ट पार्टीसह मृतदेह सैन्याच्या व्यवस्थेखाली मूळ ठिकाणी नेण्यात आल्याचं त्यात म्हटलंय.
सैनिकांमध्ये कोणताही फरक नाही : सैन्यानं आपल्या निवेदनात पुढे म्हटलंय की, सशस्त्र दल अग्निपथ योजनेच्या अंमलबजावणीपूर्वी किंवा नंतर सामील झालेल्या सैनिकांमध्ये देण्यात येणाऱ्या लाभ आणि प्रोटोकॉलच्या संदर्भात फरक करत नाही. तथापि, 1967 च्या सैन्याच्या आदेशानुसार, आत्महत्या व त्यासारख्या प्रकरणामध्ये सैन्यदलाच्या पद्धतीप्रमाणं अंत्यसंस्कार करण्यात येत नाही. या विषयावरील धोरणात सातत्य आहे. तेव्हापासून कोणताही भेदभाव न करता अनुसरण करण्यात आलं. अधिक तपशील देताना, सैन्यानं सांगितलं की, 2001 पासून सरासरी वार्षिक 100-140 सैनिकांचं नुकसान झालंय. ज्यात आत्महत्या किंवा तत्सम कारणामुळे मृत्यू झाला आहे. अशा प्रकरणांमध्ये सैन्यदलाच्या पद्धतीप्रमाणं अंत्यसंस्कार करण्यात आले नाहीत. पात्रतेनुसार आर्थिक सहाय्य किंवा मदत वितरणास, अंत्यसंस्कार आयोजित करण्यासाठी तत्काळ आर्थिक सवलतीसह योग्य प्राधान्य दिलं जातं. अशा दुर्दैवी घटनांमुळं कुटुंब आणि सैन्याला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागत असल्याचं सैन्यानं आपल्या निवेदनात म्हटंलय.
हेही वाचा :