नवी दिल्ली : पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर यास (यश) चक्रीवादळ धडकणार असून, यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हे चक्रीवादळ काही तासांमध्ये तीव्र चक्रीवादळात रुपांतरित होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. या पार्श्वभूमीवर देशाची पूर्व किनारपट्टी सज्ज झाली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या चक्रीवादळाचे केंद्र सध्या पोर्ट ब्लेअरपासून ६०० किलोमीटर दूर आहे. येत्या २४ तासांमध्ये हे चक्रीवादळ आणखी तीव्र होईल. 26 मे रोजी हे चक्रीवादळ वादळ देशाच्या पश्चिम किनारपट्टीच्या राज्यांना धडकेल. यास वादळाचा सर्वाधिक परिणाम अंदमान आणि निकोबार बेटे, ओडिशा आणि पश्चिम बंगालवर होईल. या राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
वादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने ओडिशा आणि बंगालच्या किनारपट्टी भागांना इशारा दिला आहे. किनारपट्टी भागात राहणार्या लोकांना, विशेषत: मच्छिमारांना या काळात समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. सध्या समुद्रावर गेलेल्या मच्छिमारांना 23 मे पर्यंत परतण्यास सांगण्यात आले आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, यास वादळाची तीव्रता मागील वर्षी आलेल्या 'अम्फान' प्रमाणेच असू शकते. गेल्या वर्षी जून महिन्यात अम्फान चक्रीवादळ आले होते. या वादळाचा तडाखा पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीच्या भागांना बसला होता.
अमित शाह घेणार बैठक..
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेणार आहेत. ही बैठक व्हर्चुअली पार पडेल. ओडिशा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांचे मुख्यमंत्री; आणि अंदमान व निकोबार बेटांचे लेफ्टनंट गव्हर्नरही या बैठकीला उपस्थित असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही काल (रविवारी) अशीच एक आढावा बैठक घेतली होती.
देशभरातून एनडीआरएफचे जवान किनारी भागात नेले..
एनडीआरएफने आपल्या सुमारे ९५० जवानांना देशातील विविध ठिकाणांहून एअरलिफ्ट करुन, बंगाल आणि ओडिशाच्या किनारी भागात तैनात केले आहे. याठिकाणी २६ हेलिकॉप्टरही स्टँडबाय मोडवर ठेवण्यात आले आहेत. जामनगर, वाराणसी, पटना आणि अराकोन्नमहून कोलकाता, भुवनेश्वर आणि पोर्ट ब्लेअरमध्ये सुमारे ७० टन साहित्य आणण्यात आले असल्याची माहितीही लष्कराने दिली.
सुमारे ८००हून अधिक ओडीआरएएफ कर्मचारी टॉवर लाईट, सर्च लाईट, जेनसेट्स, जेसीबी, हायड्रा क्रेन्स, इन्फ्लेटेबल बोट्स, हायड्रॉलिक ट्री कटर्स, गॅस कटर्स, प्लाज्मा कटर्स, सॅटेलाईट फोन्स आणि वॉकीटॉकी अशा साहित्यासह येणाऱ्या आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याची माहिती लष्कराने दिली.
हेही वाचा : COVAXIN च्या २ ते १८ वयोगटातील चाचण्या जूनमध्ये, जुलै-सप्टेंबरपर्यंत मिळणार परवानगी