रायपूर - छत्तीसगढच्या सूरजपूरमधील अधिकाऱ्यांची गुंडगिरी वाढताना पाहयला मिळत आहे. सूरजपूर पोलीस आणि प्रशासन चर्चेचा विषय बनले आहे. नुकतेच सूरजपूरचे जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांच्यानंतर आता उपविभागीय दंडाधिकारी प्रकाशसिंग राजपूत यांचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. ज्यामध्ये उपविभागीय दंडाधिकारी एका युवकाला चोप देत असल्याचे पाहायला मिळतयं. अद्याप उपविभागीय दंडाधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.
व्हिडिओमध्ये उपविभागीय दंडाधिकारी प्रकाशसिंग राजपूत यांनी एका तरूणाला प्रथम चापट मारल्याचे दिसते. त्यानंतर त्यांनी तरुणाला उठा-बशा काढण्यास सांगितले. यावेळी तरूण माफी मागताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओवर लोकांनी संताप व्यक्त केला असून टीका केली आहे. लॉकडाऊनमध्ये कोरोनाच्या दुसर्या लाटेने जनता त्रस्त आहे. तर अधिकाऱ्यांचे अशा गैरवर्तनाने लोकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
उपविभागीय दंडाधिकारी प्रकाशसिंग राजपूत आणि सूरजपूरचे जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांच्या व्हिडिओसह कोतवाली पोलीस स्थानकाचे प्रभारी बंसत खालखो यांचाही एका व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात बंसत खालोखा स्कुटीवरून जाणाऱ्या एका युवकाला काठीने मारहाण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. याप्रकरणी बसंत खलखो यांना शिक्षा देण्यात आली आहे.
रणवीर शर्मा यांनी तरुणाला कानाखाली मारली होती -
छत्तीसगडच्या सूरजपूरचे जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये ते लॉकडाऊनमध्ये बाहेर पडलेल्या एका तरुणाला कानाखाली मारताना दिसून येत होते. तसेच या युवकाचा मोबाईलही त्यांनी जमीनीवर आपटून फोडल्याचे यात दिसून आले. आपण औषधे आणायला चाललो असल्याचेही हा तरुण वारंवार सांगतो. मात्र, त्याचे काही एक ऐकून न घेता, जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला मारहाण केली.
गौरव कुमार सिंह सुरजपूरचे नवे जिल्हाधिकारी -
या मारहाणीचा सर्व स्तरातून निषेध झाल्यानंतर गैरवर्तन केल्यामुळे आपण हात उचलल्याचे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी माफी व्हिडिओ जारी करत माफी मागितली. यानंतर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी कारवाई करत रणवीर शर्मा यांना जिल्हाधिकारीपदावरून तात्काळ हटवले. त्यांच्या जागी गौरव कुमार सिंग यांची सूरजपूरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गौरव कुमार सिंह हे 2013 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.