चंदीगड - राष्ट्रीय राजधानी दिल्लीतून कडक सुरक्षेसह, पंजाब पोलीस बुधवारी पहाटेच गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईसह पंजाबला पोहोचले आहेत. गायक सिद्धू मुसेवाला खून प्रकरणाच्या संदर्भात त्याची चौकशी केली जाणार आहे. बिश्नोईला मानसा येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते मूसवाला यांच्या हत्येप्रकरणी मंगळवारी दिल्लीतील एका न्यायालयाने बिश्नोईचा पंजाब पोलिसांना ट्रान्झिट रिमांड मंजूर केला होता.
पंजाब पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोईला या प्रकरणात औपचारिकपणे अटक केली होती आणि त्याला न्यायालयात हजर केले होते, त्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला. बुधवारी पहाटे दिल्लीहून मानसा येथे आणल्यानंतर बिष्णईला न्यायालयात हजर करण्यात आले, त्यांनी त्याला सात दिवसांच्या पंजाब पोलीस कोठडीत पाठवले आहे.
सूत्रांनी सांगितले की, पंजाब पोलिसांचे एक पथक त्याला पंजाबमधील खरर शहरात घेऊन जात आहे, जिथे त्याची चौकशी केली जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंजाब पोलीस लॉरेन्स बिश्नोई यांना पंचावन्न प्रश्न विचारणार आहेत.
विशेष म्हणजे गायक मुसेवाला यांची पंजाबमधील मानसा जिल्ह्यात 29 मे रोजी अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली होती. यापूर्वी पंजाब पोलिसांनी सांगितले होते की मूसेवालाची हत्या ही आंतर-टोळी शत्रुत्वाची घटना होती आणि त्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सहभाग होता.
हेही वाचा - राहुल गांधींची ईडीकडून चौकशी.. काँग्रेसची हिंसक निदर्शने, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात