गोंडा (उत्तर प्रदेश) : जिल्ह्यात ग्रामपंचायतीचे तुघलकी फर्मान समोर आले आहे. ग्राम पंचायतीने प्रेमी युगुलाला गावाबाहेर राहण्याचे आदेश दिले आहेत. पंचायतीने त्यांच्या घरांना कुलूपही लावले आहे. यासोबतच गावात परत आल्यावर त्यांना मारण्याची धमकीही दिली आहे. गावात पंचायत घेऊन प्रेमी युगल आणि त्यांच्या कुटुंबीयांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून एससी, एसटी कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. एसपी आकाश तोमर यांनी सांगितले की, या प्रकरणी व्हायरल व्हिडिओची तक्रार मिळाली आहे. यानंतर पोलिसांनी नबाबगंज पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.
गावातील मजरे कल्लापूर येथे राहणाऱ्या दलित समाजातील तरुण आणि तरुणीचे प्रेम होते नंतर त्यांनी लग्न केले. ही बाब सरपंचाच्या कानावर गेली. त्यांनी विनेश पासवान या तरुणाच्या घराला कुलूप लावले व पंचायत बोलावून प्रेमी युगुलाचा हुक्का पाणी बंद करण्याचे फर्मान काढले.
दिनेश पासवान आणि खुशी पासवान यांचे लग्न गावातील गुंडांना रुचले नाही. पंचायत बोलविल्यानंतर सर्वांनी आपल्या मुला-मुलींना तंबी द्यावी, असेही फर्मान सोडण्यात आले. अन्यथा परिणाम सर्वांसाठी सारखाच होईल, असे सुनावण्यात आले. चक्क सरपंचाने प्रेमी युगलांना गावात येताच ठार मारण्याची आणि त्यांच्या कुटुंबीयांना हुक्का-पाणी बंद करण्याच्या सूचना दिल्या. घाबरून हे प्रेमी युगल घरातून पळून गेले आहे. त्यांनी व्हिडिओ जारी करून संरक्षणाची याचना केली आहे. विनेश पासवान या तरुणाने स्वत: आणि पत्नी खुशीसोबतचा एक व्हिडिओ जारी करून जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाला संरक्षण देण्याची विनंती केली आहे. त्याचवेळी त्याच्यासोबत घडलेल्या कोणत्याही घटनेसाठी सरपंच जबाबदार असतील असे म्हटले आहे.