काबूल - अफगाणिस्तानात अराजकता पसरली असून तालिबानच्या दहशतीखाली नागरिक जगत आहेत. अमेरिकेने सैन्य माघारी घेतल्यानंतर तालिबानने पंजशीर प्रांत वगळता संपूर्ण अफगाणिस्तानावर ताबा मिळवला आहे. तेथील महिलांची परिस्थिती तर अत्यंत बिकट झाली आहे. यासंदर्भात ईटीव्ही भारताने निर्वासित म्हणून दिल्लीत राहणाऱ्या मुळच्या अफगाणी असलेल्या महिलांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी अफगाणिस्तानात तालिबानच्या राजवटीखाली जगत असलेल्या महिलांवरील निर्बंध आणि तेथील परिस्थितीची माहिती दिली.
गेल्या पाच वर्षांपासून दिल्लीच्या लाजपतनगरमध्ये सिबा नावाची अफगाण महिला राहत आहे. तिने ईटीव्हीला सांगितले, अफगाणिस्तावर तालिबानने ताबा मिळवल्याची वृत्त ऐकल्यापासून मला माझ्या कुटुंबीयांची चिंता सतावत आहेत. माझी आई, आजी आणि अन्य सर्व नातेवाईक अफगाणिस्तानात आहेत. त्यांच्याशी फोनवरून बोलून झाल्याचे तिने सांगितले. तसेच शेजारी असेलेल्या काही महिला आणि मुलींना तालिबानी उचलून घेऊन गेले आहेत. तालिबानी 12 ते 15 वर्षीय मुलींना जबरदस्तीने उचलून नेतात आणि त्यांच्याशी लग्न करतात, असे तीने सांगितले
नायाब या 15 वर्षीय तरुणीने मायदेशी परत जाऊ शकत नसल्याचे दु:ख व्यक्त केले. तालिबान आता महिलांवर अत्याचार करणार नाही, असा दावा करत आहेत. शिक्षण आणि नोकरी करू देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र, त्यांच्यावर कोणत्याच महिलेला विश्वास नाही. तालिबानचा क्रुर चेहरा सर्वांनी पाहिला असल्याचे तिने सांगितले.
मुला-मुलींचे सहशिक्षण बंद -
अफगाणिस्तानवर ताबा मिळविल्यानंतर तालिबानने आपला पहिला "फतवा" जारी करत हेरात प्रांतात मुला-मुलींचे सहशिक्षण बंद करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता तालिबानच्या अधिपत्याखालील नव्या अफगाणिस्तानात नागरिकांना कशा परिस्थितीचा सामना करावा लागेल याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो. विशेष म्हणजे, तालिबानवर ताबा मिळविल्यानंतर महिलांच्या अधिकारांचे संरक्षण आणि आदर केला जाईल असे तालिबानने सुरूवातीला म्हटले होते. तालिबानचा प्रवक्ता झबिहुल्ला मुजाहिदने मंगळवारी पत्रकार परिषद घेत तालिबानकडून महिलांच्या अधिकारांचा इस्लामच्या कायद्यानुसार सन्मान केला जाईल असे म्हटले होते. मात्र, तालिबान आपले शब्द पाळत नसल्याचे दिसत आहे
हेही वाचा - तालिबानच्या क्रुरतेची कहाणीः महिलांच्या मृतदेहाबरोबर बलात्कार करतात -मुस्कान यांची माहिती