कोलकाता - सीमा सुरक्षा दला(बीएसएफ)चे जवान कायम प्रतीकूल परिस्थितीमध्ये देशाच्या सीमांचे संरक्षण करतात. हे काम करताना त्यांना अनेक संकटांचा सामनाही करावा लागतो. सध्या भारत-बांगलादेश सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफ जवानांना वाढत्या थंडीचा आणि दाट धुक्याचा सामना करावा लागत आहे.
धुक्यामध्ये काम करणे कठीण -
रात्रीच्या काळोखापेक्षा धुक्यामध्ये काम करणे कठीण जाते. धुक्यामध्ये समोरचे दृश्य दिसण्यास अडचणी येतात. याचा फायदा सीमेवरील तस्कर घेतात. हिवाळ्यामध्ये भारत-बांगलादेश सीमेवर तस्करीच्या घटनांमध्ये वाढ होते. काही वेळा हे तस्कर बीएसएफ जवानांवर हल्लेही करतात. ११ नोव्हेंबर २०२०ला भारत-बांगलादेश सीमेवर बीएसएफच्या जवानांनी एका बांगलादेशी व्यक्तीला गोळी मारली होती. ही घटना भुजारीपाराच्या मेखलीगंज परिसरात घडली होती. मोहम्मद रहमान असे या व्यक्तीच नाव होते. दाट धुक्याचा फायदा घेऊन हा व्यक्ती सीमेवरील तारेचे कुंपण ओलांडून भारताच्या सीमेवर घुसला होता.
गस्त वाढवली -
हिवाळ्यात आम्हाला जास्त अडचणींचा सामना करावा लागतो. दाट धुक्यामुळे समोरचे दृश्य दिसतच नाही. त्यामुळे हिवाळ्यात आम्ही मनुष्यबळ आणि गस्त दोन्हीही वाढवतो, असे बीएसएफच्या ६५ बटालियनचे कमांडन्ट अनिल कुमार सिंह यांनी सांगितले.