कोलकाता : एडिनोव्हायरसच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर कोलकाता येथील रुग्णालयात रविवारी रात्री ते सोमवारी दुपारपर्यंत आणखी चार मुलांचा मृत्यू झाला आहे. या चार मृत्यूंची अद्याप पुष्टी झालेली नसली तरी, बीसी रॉय चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये सर्व एडेनोव्हायरस प्रकरणांची पुष्टी झाली आहे. या चारही मुलांना खोकला, सर्दी आणि श्वासोच्छवासाचा गंभीर त्रास या लक्षणांसह रुग्णालयात दाखल करण्यात आले होते अशी माहिती मिळाली आहे.
एडिनोव्हायरस संबंधित 19 मृत्यू : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गेल्या आठवड्यात प्रसारमाध्यमांना सांगितले की, एडिनोव्हायरस संबंधित एकूण मृत्यू 19 होते, त्यापैकी सहा जणांना विषाणूची पुष्टी झाली होती. तर उर्वरित रुग्णांमध्ये कॉमोरबिडीटी होती. राज्याच्या आरोग्य विभागाने 11 मार्च रोजी जारी केलेल्या अधिसूचनेतही हीच आकडेवारी उद्धृत करण्यात आली होती. तथापि, त्यानंतर यापैकी कोणतीही मृत्यूची आकडेवारी अपडेट केली गेली नाही. अनधिकृत स्त्रोतांनी जानेवारीच्या सुरुवातीपासून 147 मृत्यूची आकडेवारी दिली आहे. संबंधित लक्षणे असलेल्या मुलांना दाखल करण्याचा दबाव बी सी रॉय चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये सर्वाधिक आहे. दुसऱ्या क्रमांकाचे मृत्यू कलकत्ता मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये झाले आहेत.
देशभरातील 38 टक्के स्वॅब नमुने पॉझिटिव्ह : आयसीएमआर (ICMR) ने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, जानेवारी ते मार्च या कालावधीत देशभरातील 38 टक्के स्वॅब नमुने एडिनोव्हायरस पॉझिटिव्ह होते. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक स्वॅब नमुने एडिनोव्हायरस पॉझिटिव्ह आढळत आहेत. तामिळनाडू 19 टक्क्यांसह दुसऱ्या, केरळ 13 टक्क्यांसह तिसऱ्या तर दिल्ली 11 टक्क्यांसह चवथ्या आणि महाराष्ट्र 5 टक्क्यांसह पाचव्या स्थानावर आहे.
एडेनोव्हायरसची लक्षणे : फ्लूसारखी सर्दी, ताप, श्वासोच्छवासाचा त्रास, घसा खवखवणे, न्यूमोनिया आणि तीव्र ब्राँकायटिस ही एडेनोव्हायरसची सामान्य लक्षणे आहेत. दोन वर्षे आणि त्याखालील मुलांना या विषाणूचा सर्वाधिक धोका आहे. हा विषाणू त्वचेच्या संपर्काद्वारे, खोकताना आणि शिंकण्याद्वारे तसेच संक्रमित व्यक्तीच्या विष्ठेद्वारे देखील पसरू शकतो. व्हायरसवर उपचार करण्यासाठी सध्यातरी कोणतेही मान्यताप्राप्त औषध किंवा कोणतेही विशिष्ट उपचार नाहीत.