कोलकाता - एआयएमआयएम पश्चिम बंगालचे प्रमुख एस. के. अब्दुल कलाम यांनी तृणमूल काँग्रेस पार्टीत प्रवेश केला आहे. त्यांच्यासह इतर सदस्यांनीही एमआयएमला सोडचिठ्ठी देत टीएमसीत प्रवेश केला.
विषारी वातावरण
मागील अनेक वर्षांपासून पश्चिम बंगाल एक शांत राज्य म्हणून ओळखले जाते. मात्र या शांततेत विषारी हवा सोडण्याचे काम सध्या सुरू झाले आहे, अशी टीका त्यांनी टीएमसीत प्रवेश करतेवेळी भाजपावर केली. टीएमसीच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्यमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांच्या उपस्थितीत कलाम यांनी प्रवेश केला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी टीएमसीची वाट धरली आहे.
नागरिकांशी साधला संवाद
ते पुढे म्हणाले, की एमआयएमने पश्चिम बंगालच्या राजकारणात आधीच प्रवेश करायला हवा होता. आता मात्र येथे योग्य वातावरण नाही. मी बांकुरा, मुर्शिदाबाद, कूचबिहार आणि मालदा या जिल्ह्यांचा दौरा केला. तेथील नागरिकांशी बोललो. सध्याची विषारी हवा रोखायला हवी, असा सूर निघाला. त्यानंतर आपण तृणमूलमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले.
एप्रिल-मेमध्ये निवडणूक?
२९४ सदस्यांच्या विधानसभेसाठी पश्चिम बंगालमध्ये एप्रिल-मेमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. साधारण १०० ते ११० जागांवर मुस्लीम मतांचा प्रभाव लोकसभा निवडणुकीत जाणवला. टीएमसीला त्याचा फायदा झाला. आता कलाम यांच्या प्रवेशानंतर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.