लखनऊ (उत्तर प्रदेश) Accused Studies Law Proves Innocence : उत्तर प्रदेशातल्या बागपत जिल्ह्यातील एका व्यक्तीला १२ वर्षांपूर्वी एका खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आलं होतं. यासाठी त्याला तुरुंगवासही भोगावा लागला. यानंतर या व्यक्तीनं कायद्याचा अभ्यास केला. आता त्यानं स्वत: त्याचं निर्दोषत्व सिद्ध केलं आहे. न्यायालयानं या व्यक्तीची सर्व आरोपातून मुक्तता केली.
काय आहे प्रकरण : अमित चौधरी असं या व्यक्तीचं नाव आहे. तो २०११ मध्ये बागपत येथे आपल्या बहिणीच्या सासरी गेला होता. तो तेव्हा १८ वर्षांचा होता. दरम्यान, तिथे दोन पोलीस अधिकार्यांवर हल्ला झाला, ज्यात एका पोलिसाला आपला जीव गमवावा लागला, तर दुसरा जखमी झाला. या घटनेनं उत्तर प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांचं लक्ष वेधलं होतं. त्यांनी या प्रकरणी गुन्हेगारांना त्वरित अटक करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणात १७ जणांना आरोपी करण्यात आलं होतं. त्यापैकी एक आरोपी अमित चौधरी होता.
जामिनावर सुटका झाली : अमित त्यावेळी ग्रॅज्युएशन करत होता. मात्र, खुनाच्या गुन्ह्यात अडकल्यामुळं त्याच्या कारकिर्दीला मोठा फटका बसला. त्याला काही काळ तुरुंगातच खितपत पडावं लागलं. दोन वर्ष तुरुंगात घालवल्यानंतर, त्याची जामिनावर सुटका झाली. यानंतर त्यानं स्वत:ची केस लढण्यासाठी कायद्याचा अभ्यास सुरू केला. त्यानं आधी बीए, नंतर एलएलबी आणि एलएलएम असे शैक्षणिक टप्पे गाठले आणि शेवटी बार कौन्सिलची परीक्षा उत्तीर्ण केली.
स्वत:च्या केसचं प्रतिनिधित्व केलं : वकील बनल्यानंतर अमितनं स्वतःच्या खटल्याची जबाबदारी स्वतः घेतली. त्यानं या केसचा पाठपुरावा सुरू केला. न्यायालयात जजसमोर त्यानं स्वत:च्या केसचं प्रतिनिधित्व केलं. या प्रकरणी नुकताच आलेल्या निर्णयात चौधरी याच्यासह १३ जणांना निर्दोष ठरवण्यात आलं आहे. हत्येचे खरे सूत्रधार सुमित कैल, नीतू आणि धर्मेंद्र यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली. कैल २०१३ मध्ये एका चकमकीत मारला गेला. नीतूला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, तर धर्मेंद्रचा निकालापूर्वी कर्करोगानं मृत्यू झाला.
सैन्यात भरती होण्याचं स्वप्न होतं : अमित चौधरी याचं सैन्यात भरती होण्याचं स्वप्न होतं. त्यासाठी त्यानं तयारीही सुरू केली होती. मात्र नियतीच्या मनात काही औरच होतं. आता निर्दोष सुटल्यानंतर अमितनं चुकीच्या पद्धतीनं खटल्यांमध्ये अडकलेल्या आणि तुरुंगवास भोगणाऱ्यांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अशा व्यक्तींना मोफत मदत करण्याचं आश्वासन त्यानं दिलं आहे.
हे वाचलंत का :