कोलकाता - नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भव्य विजयानंतर तृणमूल काँग्रेस (टीएमसी) चे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्त झालेल्या अभिषेक बॅनर्जी यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. पक्षाचा देशभरात विस्तार करण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या एका महिन्यात संपूर्ण योजना मांडणार असल्याचे ही ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपावर निशाणा साधला.
भाजपवर टीकास्त्र घेताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि डायमंड हार्बरचे खासदार म्हणाले की, जिथे जिथे टीएमसी पाय ठेवेल तिथे भाजपाला पराभूत करेल. एक-दोन आमदार जिंकू असे नाही. तर राज्य जिंकणे आमचे लक्ष्य असणार आहे. बॅनर्जी यांचे कार्य, संघर्ष लोकापर्यंत पोहचवू, असे अभिषेक बॅनर्जी म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत केल्याबद्दल धन्यवादाची देशभरातून एक लाखाहून अधिक ई-मेल प्राप्त झाले आहेत, असे त्यांनी सांगितले. तसेच पुढील 20 वर्षे मला कोणतेही सार्वजनिक पद किंवा मंत्रीपद मिळवायचे नाही. मी फक्त टीएमसीच्या विस्तारावर लक्ष केंद्रित करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपा आमदार संपर्कात -
भाजपाचे अनेक आमदार टीएमसीमध्ये सामील होण्यासाठी संपर्कात आहेत. पक्ष सोडलेल्या अन्य आमदारांनी टीएमसीकडे संपर्क साधला आहे. ममता बॅनर्जी कार्यकारी समितीच्या पुढील बैठकीत या संदर्भात निर्णय घेतील, असे बॅनर्जी यांनी सांगितले.