पणजी : आम आदमी पक्षाच्या ३९ उमेदवारांनी पक्षाची एकनिष्ठ राहण्याच्या शपथपत्रावर सही केली. पक्ष सोडून जाणार नाही, भ्रष्टाचार करणार नाही, असे या शपथपत्रात लिहिले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नॅशनल कन्व्हेअर अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत आपच्या उमेदवारांनी या शपथपत्रावर सही केली आहे. दरम्यान, कॉंग्रेसने उमेदवारांना धार्मिक स्थळी नेवून पक्ष सोडणार नाही, अशी शपथ दिली होती. गोव्याच्या राजकारणातील राजकीय अस्थिरता याला कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.
विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे उमेदवार विजयी झाल्यावर ते इतर पक्षातील उमेद्वारांप्रमाणे पक्ष बदल करणार नाहीत आणि भ्रष्टाचार देखील करणार नाहीत याचे आश्वासन निवडणुकीपूर्वी मतदारांना देण्यासाठी आम्ही हे प्रतिद्यापत्र भरून देत असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. यावेळी सर्व उमेदवारांनी पक्ष न सोडण्याची शपथ घेत आपले वैयक्तिक प्रतिद्यापत्र सादर केले आहे. तसेच हे प्रतिद्यापत्र प्रत्येक मतदारपर्यंत पोहोचवणार असल्याचे पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार अमित पालेकर यांनी सांगितले. केजरीवाल गोव्याच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत.
कॉंग्रेसने उमेदवारांना धार्मिक स्थळी दिली होती शपथ
कॉंग्रेसने २२ जानेवारी रोजी ३६ उमेदवारांना मंदीर, चर्च आणि मशिद या धार्मिक स्थळी नेवून पक्ष निष्ठेची शपथ दिली होती. पणजीतील महालक्ष्मी मंदीर, बॅम्बोलिम क्रॉस चर्च आणि बेतीम येथील हमजा शहा दर्गा येथे नेवून कॉंग्रेसने उमेदवारांना शपथ दिली होती. माजी केंद्रीय मंत्री पी. चिदमबरम आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामथ यांच्या नेतृत्त्वात ही शपथ देण्यात आली होती.
कॉंग्रेसला बसला होता घोडेबाजाराचा फटका
जुलै २०१९ मध्ये कॉंग्रेसच्या १० आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पावसाळी अधिवेशनाच्या अगदी आधी या उमेदवारांनी कॉंग्रेसला रामराम ठोवून भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचे १७ आमदार निवडून आले होते. त्यातील १५ आमदारांनी पक्ष सोडला असून केवळ दोन आमदार कॉंग्रेसमध्ये सध्या आहेत. विरोधी पक्ष नेते चंद्रकांत कवळेकर यांच्या नेतृत्त्वात तब्बल १० आमदरांनी भाजपमध्ये प्रवेश करुन सर्वांना धक्का दिला होता.